देवीच्या मंदिरांमध्ये स्त्री पुजारी नेमावेत

By Admin | Updated: May 19, 2016 00:24 IST2016-05-18T23:31:25+5:302016-05-19T00:24:04+5:30

छायाताई महाले : जिजाऊ ब्रिगेडची राज्यभर चळवळ उभारण्याची तयारी

Female priests in the temple of Goddess | देवीच्या मंदिरांमध्ये स्त्री पुजारी नेमावेत

देवीच्या मंदिरांमध्ये स्त्री पुजारी नेमावेत

सांगली : राज्यातील देवीच्या बहुतांश मंदिरात पुरुष पुजारी आहेत. ती एक प्रकारची विटंबना ठरत आहे. त्यामुळे देवीच्या सर्वच मंदिरात स्त्री पुजारी नियुक्त कराव्यात, यासाठी जिजाऊ ब्रिगेड राज्यभर चळवळ सुरू करणार आहे, अशी माहिती ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. छायाताई महाले यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या की, देवीच्या मंदिरात स्त्री पुजारीच हवी. पुरुष पुजाऱ्यांनी देवीची वस्त्रे बदलल्याने विटंबना होत आहे. देवी ही जरी मातेसमान मानली जात असली तरी, ती असा अधिकार कोणत्याही पुरुषाला देत नाही. त्यामुळे ही एक प्रकारची विटंबनाच असून, ती गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरांमध्ये सुरू आहे. ती थांबविण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने पावले उचलली आहेत. देवीच्या मंदिरांमध्ये स्त्री पुजारी नियुक्त करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत. याची सुरुवात आम्ही कोल्हापुरातून करू. लवकरच कोल्हापुरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याबाबतची मागणी करणार आहोत. त्यानंतर राज्यातील देवीच्या अन्य मंदिरांबाबतही आम्ही अशीच भूमिका स्वीकारणार आहोत.
मंदिरांतून मोठ्या प्रमाणावर जे धन पडून आहे, त्याचा वापर जलसंधारणाच्या कामांसाठी करावा, हे धन लोकांनीच मंदिरांना दिलेले आहे. त्यामुळे ते लोकांसाठी पुन्हा वापरले, तर काही बिघडणार नाही. मंदिरांमध्ये हे धन विनावापर पडून आहे. त्यामुळे त्याबाबतची मागणीही आम्ही शासनाकडे करणार आहोत. राज्यभरात आम्ही स्त्री सक्षमतेची मोहीम राबवित आहोत. स्त्रिया सक्षम झाल्या, तर शहरी तसेच ग्रामीण अर्थकारण मजबूत होऊ शकते, असे त्या म्हणाल्या. यावेळी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा हेमलता देसाई, रुपाली राऊत, सुवर्णा माने, सुप्रिया घारगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


पाणीप्रश्नावरही पुढाकार
पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या प्रश्नाचा थेट सामना हा महिलांनाच करावा लागतो. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रयत्न करू, असेही महाले यांनी सांगितले.

Web Title: Female priests in the temple of Goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.