मिरजेतील अॅपेक्स कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यासह अन्य आठ रुग्णालय कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. डॉ. जाधव याच्या ॲपेक्स रुग्णालयात अकाैंटंट म्हणून काम करणारी नीशा पाटील हिला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे अॅपेक्स प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक झाली आहे. नीशा पाटील हिच्याकडून, रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेतलेल्या जादा बिलाबाबत व बिलातील घोटाळ्याबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे.
रुग्णालयात कोणत्याही सुविधा नसताना महापालिकेने डाॅ. जाधव यास कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाल्याने रुग्णालयाला दिलेल्या परवानगीबाबत पोलीस महापालिकेकडे विचारणा केली होती. डॉ. जाधव यास अॅपेक्स रुग्णालय सुरू करण्यासाठी परवानगी देताना आवश्यक वैद्यकीय सुविधांची पडताळणी केली नसल्याचे व केवळ एकपानी अर्जावर परवानगी दिल्याचे महापालिका प्रशासनाने पोलिसांना कळविले आहे. परवानगीसाठी केलेल्या अर्जासोबत डॉ. जाधव याने तेथे काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, नावांची यादी दिली नसल्याचेही महापालिकेने कळविले आहे. यामुळे डाॅ. जाधव यास कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी नियमबाह्य परवानगी दिल्याचे महापालिका प्रशासनानेच कबूल केल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.