महिला कर्मचाऱ्याला दाम्पत्याची मारहाण

By Admin | Updated: January 14, 2016 00:04 IST2016-01-13T23:38:30+5:302016-01-14T00:04:57+5:30

विजयनगरमधील प्रकार : पाणीपुरवठ्याचे थकीत बिल वसुलीवेळी घटना

Female assault of a female employee | महिला कर्मचाऱ्याला दाम्पत्याची मारहाण

महिला कर्मचाऱ्याला दाम्पत्याची मारहाण

सांगली : थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याला थकबाकीदार दाम्पत्याने मारहाण केल्याची घटना बुधवारी विजयनगर येथे घडली. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मीटर रीडरलाही धक्काबुकी झाली. या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांत दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकबाकी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट दिले आहे. कर्मचारी, मीटर रीडरसह सर्वजण वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. बुधवारी पाणीपुरवठा विभागाकडील वॉरंट अधिकारी राजश्री अशोक चौगुले व मीटर रीडर इब्राहीम पखाली विजयनगर येथील गजानन सोसायटीमध्ये थकबाकीदारांकडे वसुलीसाठी गेले होते. सोसायटीतील गिरीजा बंगला येथे राहणाऱ्या सुप्रिया व प्रशांत सिंग या दाम्पत्याच्या दोन घरांचे अनुक्रमे १७ हजार ३०८ रुपये व ७२ हजार ५२३ रुपये पाण्याचे बिल थकित आहे. चौगुले व पखाली यांनी सिंग दाम्पत्याला पाण्याचे बिल भरण्याची विनंती केली. अन्यथा पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला. त्यामुळे सिंग दाम्पत्याने चौगुलेंना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यात पखाली यांनी मध्यस्थी करीत, चौगुले यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठ्याचे बी. एन. वाडकर यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग ठाण्यात धाव घेतली. स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक युवराज गायकवाड यांनीही चौगुले यांची विचारपूस केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंग दाम्पत्यावर रात्री गुन्हा दाखल झाला.
कनेक्शन परस्पर जोडले
सिंग दाम्पत्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचे बिल थकीत आहे. गजानन सोसायटीसह अन्य एका ठिकाणी त्यांचे घर आहे. या दोन्ही ठिकाणची थकबाकी ९० हजारांच्या घरात गेली आहे. यापूर्वी दोनदा त्यांचे पाणी कनेक्शन तोडले होते; पण त्यांनी परस्परच पाणी कनेक्शन जोडून घेतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Female assault of a female employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.