सासरच्या त्रासाला कंटाळुन बेवनूरला विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:36+5:302021-06-10T04:19:36+5:30
संख : बेवनूर (ता. जत) येथील ऋतुजा अमोल सरगर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोन्याचे दुकान ...

सासरच्या त्रासाला कंटाळुन बेवनूरला विवाहितेची आत्महत्या
संख : बेवनूर (ता. जत) येथील ऋतुजा अमोल सरगर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोन्याचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. म्हणून सासरच्या नातेवाईकांनी वेळोवेळी मारहाण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे. त्या त्रासाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याची फिर्याद तिचे वडील गोरख बाबासाहेब लवटे (वय ४१, रा बुध्याळ, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी जत पाेलीस ठाण्यात दिली आहे.
ऋतुजा हिचा विवाह बेवनूर येथील अमोल आप्पा सरगर याच्याबरोबर २५ जून २०२० रोजी झाला. अमोल हा राजकोट (राजस्थान) येथे सोन्याच्या आटणीचे काम करतो. लग्नानंतर अमोल तिला राजकाेट येथे घेऊन गेला. एप्रिल महिन्यात दोघे गावी आले होते. अमाेल ऋतुजाकडे साेन्याचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून दाेन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत हाेता. जोपर्यंत दोन लाख रुपये आणत नाहीस, तोपर्यंत तुला माहेरी पाठवणार नाही, असे म्हणून मारहाण करून तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता.
मंगळवारी दुपारी १ वाजता गोरख लवटे यांना बेवनूर येथील त्यांचे मावसभाऊ तानाजी अशोक सरगर यांनी फोन करून ऋतुजाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर तात्काळ लवटे कुटुंबीय बेवनूरमध्ये आले. ऋतुजाच्या अंगावर कोठेही व्रण नव्हते; मात्र तिच्या गळ्यावर काळसर व्रण दिसत होते. जावई अमोल याच्यासह सरगर कुटुंबियांनी ऋतुजाला विजेचा धक्का बसल्याचे सांगत शेतातच अंत्यविधी केले. यावेळी गाेरख लवटे यांना संशय आल्याने त्यांनी मावसभाऊ अशोक सरगर यांना घेऊन अमोल यास विचारले असता, त्याने ‘ऋतुजाने गळफास घेतला होता. मी रानातून आल्यावर तिला खाली उतरविले. ताेपर्यंत तिचा मृत्यू झाला हाेता.’ असे सांगितले. यानंतर लवटे यांनी नवरा अमोल हाच ऋतुजाच्या मृत्यूस जबाबदार आहे. अशी तक्रार दिली आहे. ऋतुजाने आत्महत्या केलेली असतानाही अमाेलने पोलिसांना कळविले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा संशय वाढला आहे. अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.