अडीच कोटी खड्ड्यात जाण्याची भीती
By Admin | Updated: March 16, 2015 00:06 IST2015-03-15T22:55:34+5:302015-03-16T00:06:11+5:30
इस्लामपुरातील रस्ते कामास प्रारंभ : निकृष्ट दर्जामुळे पवार बंधू-सत्ताधाऱ्यांत संघर्ष

अडीच कोटी खड्ड्यात जाण्याची भीती
अशोक पाटील - इस्लामपूर शहरातील प्रमुख सात रस्त्यांचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यासाठी पालिका प्रशासनाने अडीच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हे काम युनिटी बिल्डर्सला देण्यात आले आहे. यातील काही रस्तेकाम पूर्णत्वाला आले आहे, तर काही रस्त्यांचे काम सुरु आहे. ही कामे निकृष्ट होत आहेत, म्हणून एम. डी. पवार यांचे नातू वैभव पवार आणि विजय पवार रस्त्यावर उतरले आहेत. ठेकेदाराकडून कराराची पायमल्ली होत असल्याचा आरोप पवार बंधूंचा असून, जुजबी होणारे काम बंद पाडले जात आहे. या विरोधाला न जुमानता सत्ताधारी हे काम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे रस्ते करण्यासाठी आलेला निधी खड्ड्यात जाणार आहे.शहरातील भुयारी गटार योजनेची घोषणा हवेतच विरली आहे. भुयारी गटार योजना होण्याअगोदरच प्रमुख सात रस्त्यांचे काम युनिटी बिल्डरला देण्यात आले आहे. या ठेकेदाराने रस्ते करताना पालिकेबरोबर केलेल्या कराराला केराची टोपली दाखवून, निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. यावर काँग्रेसचे वैभव पवार व त्यांचे बंधू विजय पवार यांनी रस्त्यावर उतरून होणाऱ्या या निकृष्ट कामाला अटकाव केला आहे. काम बंद पाडले जात असले तरी, चांगल्या दर्जाचे काम होण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला जात नाही. त्यामुळे सत्ताधारी ताकदीच्या जोरावर निकृष्ट कामे पूर्ण करुन घेत आहेत.
सध्या आष्टा नाका ते तहसील कार्यालय, आष्टा नाका ते संभूआप्पा मठ, शाळा नं. १ ते मुरारराव शिंदे यांचे घर, शिराळा नाका ते मोमीन मोहल्ला, उर्दू शाळा ते जयहिंद चित्रपटगृहापर्यंत, झरी नाका ते संभाजी चौक, यल्लम्मा चौक, शिराळा नाका ते गणेश मंदिर, कापूसखेड नाक्यापर्यंत, यल्लम्मा चौक ते जुन्या बहे नाक्यापर्यंत अशा एकूण ७ रस्त्यांवर पालिका प्रशासन अडीच कोटी खर्ची टाकणार आहे.त्यापैकी शिराळा नाका, गणेश मंदिर, कापूसखेड नाका रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. परंतु १५ दिवसातच हा रस्ता उखडला असल्याचा आरोप वैभव पवार यांनी केला आहे. एकंदरीत पवार बंधू काँग्रेसचे असल्याचे मानले जाते. त्यांचे आजोबा एम. डी. पवार यांची इस्लामपूर पालिकेवर २५ वर्षे सत्ता होती. ही सत्ता उरुण परिसरातील पाटील भावकीने संपुष्टात आणली. तेव्हापासून सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील करीत आहेत. त्यामुळे की काय, वैभव पवार आणि विजय पवार यांनी निकृष्ट दर्जाच्या रस्तेकामावरुन पाटील यांना टार्गेट केले आहे. या दोघांच्या आंदोलनाला भाजप, शिवसेना यांचा जुजबी पाठिंबा असल्याने सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन रस्त्याचे काम सुरुच ठेवले
आहे.
१९८५ पासून पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी गोड बोलून प्रत्येकाचा कार्यक़्रम केला आहे. सत्ताधाऱ्यांतील जे जे विद्यमान आणि माजी नगरसेवक त्यांच्या नादाला लागले आहेत, त्यांची अवस्था काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
- वैभव पवार, माजी नगरसेवक.
ठेकेदाराकडून कराराला केराची टोपली
मुळातच इस्लामपूर शहरातील भुयारी गटर योजनेची घोषणा हवेतच विरली आहे. त्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या सात रस्त्यांचे काम युनिटी बिल्डर्स या ठेकेदार कंपनीने अत्यंत निकृष्ट दर्जाचे करत पालिकेबरोबर केलेल्या कराराला केराची टोपली दाखवली आहे. यामुळेच पालिकेत सत्ताधारी व विरोधकांतील संघर्ष वाढला आहे.