तासगाव : तासगाव शहरातील कांबळेवाडी येथे व्यसनाधीन मुलाने स्वतःच्या वडिलांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. सुधाकर तुकाराम कांबळे (वय ६५), असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. त्यांचा मुलगा सचिन सुधाकर कांबळे (रा. कांबळेवाडी) यानेच ही हत्या केली आहे.
मृत कांबळे यांची पुतणी सुनीता अशोक कांबळे (४०, रा. कांबळेवाडी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३च्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.शनिवारी दुपारी १२ ते ४:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी सचिनने आपल्या राहत्या घरी वडिलांना ‘तुम्ही माझ्यासाठी काही कमावून ठेवले नाही,’ असे म्हणत शिवीगाळ केली. या रागातून सचिनने सुधाकर कांबळे यांना मारहाण केली. मारहाणीत सुधाकर कांबळे गंभीर जखमी झाले होते. मुलगा सचिन हा व्यसनी होता, त्याने वडिलांना मारहाण केल्यानंतर वडील जागीच पडून होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांच्यासह पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची फिर्याद मृत सुधाकर कांबळे यांची पुतणी सुनीता कांबळे यांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी सचिन कांबळे याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ करीत आहेत.