सोनी : सोनी-भोसे (ता. मिरज) रस्त्यावरील शेतात शेतकरी पिता-पुत्राने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. गणेश हिंदुराव कांबळे (वय ५२), इंद्रजित गणेश कांबळे (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. आज पहाटे गणेश कांबळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे गेले होते. शेतात ते बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसल्याने इतर शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. गावातील रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजित व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. गणेश कांबळे यांना रुग्णवाहिकेतून घेवून जात असताना, अचानक इंद्रजितनेही मागे जाऊन कीटकनाशक प्राशन केले. या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित सर्वांचीच धांदल उडाली.पिता-पुत्रांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.इंद्रजितचा महिन्याभरापूर्वी झाला होता विवाह इंद्रजित कांबळे यांचा अवघ्या महिन्याभरापूर्वी विवाह झाला होता. तरीही वडील आणि नवविवाहित पुत्राने असा टोकाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Sangli: सोनी येथे शेतकरी पिता-पुत्राने कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:00 IST