चुकीच्या आणेवारीमुळे उपोषणाचा इशारा
By Admin | Updated: December 2, 2014 00:18 IST2014-12-01T23:27:51+5:302014-12-02T00:18:44+5:30
अनेक ठिकाणी पेरण्याही झाल्या नाहीत. आणेवारी ठरविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पीक परिस्थिती, पीक कापणी, मळणी व उत्पादन याचे प्रात्यक्षिक घेण्यात

चुकीच्या आणेवारीमुळे उपोषणाचा इशारा
मालगाव : जिल्ह्यात दुष्काळी गावांची वस्तुस्थिती डावलून चुकीच्या लावण्यात आलेल्या आणेवारीचे फेरसर्वेक्षण करून शेतकऱ्यांना सवलती जाहीर कराव्यात यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. ८ डिसेंबरपासून मालगाव तलाठी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मिरज तालुका उपाध्यक्ष महेश सलगरे यांनी दिला आहे.
जिल्ह्यात पाऊस उशिराने सुरू झाल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था वाईट होती. अनेक ठिकाणी पेरण्याही झाल्या नाहीत. आणेवारी ठरविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पीक परिस्थिती, पीक कापणी, मळणी व उत्पादन याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे.मात्र दुष्काळसदृश गावातील पीक आणेवारी ५० पैशापेक्षा जादा लावण्यात आली आहे. चुकीच्या पीक आणेवारीचा फटका जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. यासाठी दुष्काळग्रस्त गावातील आणेवारीचे फेरसर्वेक्षणचे आदेश देऊन दुष्काळ जाहीर करावा, चुकीची आणेवारी लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, द्राक्ष व डाळिंब नुकसानीची भरपाई मिळावी, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, शेतसारा माफ, शेतीचे वीज बिल माफ करावे, जिल्ह्यातील म्हैसाळसह सर्व पाणी योजना बारमाही सुरू कराव्यात, या मागण्यांसाठी उपोषण करणार असल्याचे सलगरे यांनी सांगितले.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी पाठिंब्यासाठी ग्रामपंचायतींना पत्रे पाठविली आहेत. (वार्ताहर)
पंतप्रधानांना पत्र!
चुकीच्या आणेवारीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. जिल्ह्यातील चुकीच्या आणेवारीचे फेरसर्वेक्षण करावे, यासह विविध मागण्यांसाठी महेश सलगरे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.