‘टेंभू’साठी कडेगावात उपोषण आणि तोडगा

By Admin | Updated: August 28, 2015 23:06 IST2015-08-28T23:06:56+5:302015-08-28T23:06:56+5:30

अधिकाऱ्यांची मध्यस्थी : कालव्याचा मार्ग मोकळा; चार गावांतील शेतकऱ्यांना दिलासा

Fasting and settlement for 'Tembhava' | ‘टेंभू’साठी कडेगावात उपोषण आणि तोडगा

‘टेंभू’साठी कडेगावात उपोषण आणि तोडगा

कडेगाव : विहापूर (ता. कडेगाव) येथील टेंभू योजनेचा पोटकालवा जेसीबीच्या साहाय्याने बुजविण्यात आला आहे. यामुळे बेलवडे, निमजोड, सोहोली, सासपडे या चार गावांतील शेतीचे पाणी बंद झाले आहे. हा पोटकालवा खुदाई करून पाणी मिळावे, या मागणीसाठी रवींद्र शंकर सूर्यवंशी, विशाल विश्वनाथ सूर्यवंशी, पोपट विठोबा मुळीक, मनोज किसनराव मोहिते या चार शेतकऱ्यांनी आज सकाळी बेमुदत उपोषण सुरू केले. परंतु टेंभू योजनेचे अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला आणि उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.
विहापूर येथील काशिनाथ चव्हाण या शेतकऱ्याने त्यांच्या शेतामधून नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने पोटकालवा खुदाई झाल्याचा दावा करून हा पोटकालवा बुजवून घेतला. यामुळे पुढील चार गावांना योजनेचे पाणी मिळत नाही. ऐन दुष्काळी परिस्थितीत पिके कोमेजून चालली आहेत. अशा परिस्थितीत पाणी मागणीसाठी शुक्रवारी बेलवडे, निमजोड, सोहोली व सासपडे येथील चौघांनी उपोषण सुरू केले होते. दरम्यान, काशिनाथ चव्हाण या शेतकऱ्यानेही, माझ्या शेतातून अन्यायी व बेकायदेशीर कालवा खुदाई झाली असल्याची कागदपत्रे दाखल करून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
यावर टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे, उपकार्यकारी अभियंता एस. एम. पाटील, कडेगावचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, पोलीस निरीक्षक अशोक कदम, विहापूर येथील राजाराम चव्हाण यांनी टेंभू योजनेच्या कार्यालयात बैठक घेऊन तोडगा काढला.
काशिनाथ चव्हाण यांच्या शेतामधून गेलेल्या पोटकालव्याच्या भराव्याच्या दोन्ही बाजू त्यांना शेतीपिकासाठी वापरण्यास सांगितल्या, तसेच कमीत कमी जागेत कालवा खुदाई करून पुढील गावांना पाणी देण्याचा सर्वसमावेशक निर्णय झाला. तसेच भूसंपादनाची कार्यवाही लवकर करून काशिनाथ चव्हाण यांना संपादित जमिनीचा तात्काळ मोबदला देण्याचाही निर्णय झाला. यामुळे आता तात्काळ कालवा खुदाई होईल आणि चारही गावांच्या शेतजमिनीला पाणी मिळेल, असा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला.
तोडगा निघाल्यावर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपकार्यकारी अभियंता एस. एम. पाटील, पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांना सरबत दिले आणि उपोषणाची सांगता झाली.
यावेळी सुरेश घार्गे, सागरेश्वर सूतगिरणीचे संचालक विक्रम मोहिते, सुरेश यादव, सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण पोळ यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Fasting and settlement for 'Tembhava'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.