मिरज पश्चिम भागातील शेतकरी धीराने उभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:09+5:302021-08-15T04:27:09+5:30
कसबे डिग्रज : कृष्णा आणि वारणा नदीला जुलैमध्ये आलेल्या महापुराचा फटका बसला. मिरज पश्चिम भागातील अनेक गावांतील नागरिकांचे स्थलांतर ...

मिरज पश्चिम भागातील शेतकरी धीराने उभा
कसबे डिग्रज : कृष्णा आणि वारणा नदीला जुलैमध्ये आलेल्या महापुराचा फटका बसला. मिरज पश्चिम भागातील अनेक गावांतील नागरिकांचे स्थलांतर झाले. या परिस्थितीत घरांसह शेतीचेही प्रचंड नुकसान होऊनही येथील नागरिक धीराने पुढच्या आयुष्याची वाटचाल करत आहेत. पूर ओसरल्यावर स्वच्छतेची कामे संपवून शेतातील कामे सुरू केली आहेत. दुकाने, व्यवसाय, दैनंदिन व्यवहार सुरू होऊन जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे.
कृष्णा नदीची पाणीपातळी सांगलीतील आयर्विन पुलानजीक ४० फूट झाली की कसबे व माैजे डिग्रजदरम्यानचा बंधारा पाण्याखाली जातो व गावात पाणी शिरते. यावेळी पाणी ५४ फुटांवर गेले होते. कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, पद्माळे या गावांना; तर वारणा नदीच्या पुराचा फटका दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, समडोळी, कवठेपिरान या गावांना बसला. यात १० हजार एकरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
पूर ओसरल्यानंतर गावागावात वीज पुरवठा, पाणी पुरवठा सुरू झाला आहे. घरांची, दुकानांची स्वच्छता करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, काही संस्था, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पथक व तरुण मंडळींनी स्वच्छता मोहीम राबविली. काही गावांचा अपवाद वगळता इतर गावांमध्ये धान्य वाटप करण्यात येत आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
मिरज पश्चिम भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. २०१९ व २०२१ च्या पुराने शेतीला फटका बसला आहे. अशा परिस्थितीतही येथील शेतकरी आता नव्या उमेदीने आणि धीराने नव्या आव्हानांना सामोरा जात आहे. ही संकटकाळात एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.