शेतकऱ्यांनी पर्यायी पीकपद्धतीचा अवलंब करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:51+5:302021-07-04T04:18:51+5:30
विटा : पारंपरिक पिकांना फाटा देऊन कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचा शेतकऱ्यांनी विचार करावा. जैवइंधन आणि सेंद्रीय खतनिर्मिती ...

शेतकऱ्यांनी पर्यायी पीकपद्धतीचा अवलंब करावा
विटा : पारंपरिक पिकांना फाटा देऊन कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचा शेतकऱ्यांनी विचार करावा. जैवइंधन आणि सेंद्रीय खतनिर्मिती करणारा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प मंगरूळ येथे उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले.
मंगरूळ (ता. खानापूर) येथे सयाजीनंद अॅग्रो प्रोड्युसरच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पहिल्या जैवइंधन व सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार बाबर बोलत होते. यावेळी कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष अशोकराव शिंदे, कार्यकारी संचालक राहुल शिंदे, पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, बाजार समितीचे सभापती राहुल साळुंखे, कृषी अधिकारी प्रकाश कुंभार, एम.सी.एल.चे वैभव चव्हाण, अजित पाटील उपस्थित होते.
आमदार अनिल बाबर म्हणाले, शेतात पाणी आल्यानंतर जिरायत जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी धडपडत असतात. सध्या ऊस, द्राक्ष, फळबागा यांकडे जास्त कल दिसत आहे. उसाला केंद्र सरकार अनुदान देत असल्याने साखर उत्पादन होत आहे. आपल्यापेक्षा परदेशातील साखर स्वस्त मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसपिकासह फळबागांना पर्याय शोधला पाहिजे.
अशोकराव शिंदे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी वैभव चव्हाण, प्रकाश कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंदराव शेळके, बाळासाहेब जाधव, आनंदराव सुर्वे, अविनाश जाधव, रवींद्र शिंदे, शिवाजी पवार, अजित साळुंखे, नामदेव जाधव उपस्थित होते. कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी आभार मानले.
फोटो - ०३०७२०२१-विटा-मंगरूळ : खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथे सांगली जिल्ह्यातील पहिल्या जैवइंधन निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार अनिल बाबर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अशोकराव शिंदे, सभापती महावीर शिंदे, वैभव चव्हाण, राहुल साळुंखे उपस्थित होते.