पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ !

By Admin | Updated: April 20, 2015 00:02 IST2015-04-19T23:28:23+5:302015-04-20T00:02:36+5:30

पलूस तालुक्यातील स्थिती : द्राक्ष, ऊस हंगाम अंतिम टप्प्यात

Farmers run water for water! | पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ !

पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ !

किर्लोस्करवाडी : पलूस तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून काही भागात शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. यामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचे आटोकाट प्रयत्न सुरु असून पाणी उपलब्ध करण्यासाठी धावपळ सुरू आहे. तालुक्यात ऊस व द्राक्ष हंगाम जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे.
पलूस तालुका सधन तालुका म्हणून ओळखला जातो. कृष्णा नदीमुळे काही अपवाद वगळता सर्वच गावात सहकारी पाणीपुरवठा योजना आहेत, तर येरळा काठावरील गावांना आरफळचे पाणी मिळू लागले आहे. पाण्याची बऱ्यापैकी सोय असल्याने शेतीचे उत्पन्नही चांगले मिळते.
एकूण २७ हजार ४४६ हेक्टरपैकी २४ हजार ६९४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक आहे. कृष्णाकाठावर तर संपूर्ण उसाचीच शेती केली जाते. उसापाठोपाठ द्राक्षबागांचे क्षेत्रही आहे. पलूस, आंधळी, मोराळे, बांबवडे, कुंडल, आमणापूर, सांडगेवाडी, सावंतपूर, गोंदीलवाडी, शिवाजीनगर, घोगाव आदी गावांमध्ये द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.
अलीकडे द्राक्षबागांमधील अडचणी लक्षात घेऊन काही द्राक्ष बागायतदार केळी, डाळिंब उत्पादनाकडे वळल्याचे पाहावयास मिळते. शेतीला जोडव्यवसाय म्हणून म्हैस, गाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय येथील शेतकरी करीत आहेत.
सध्या पलूस तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. कूपनलिकांच्या तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. उन्हामुळे पिकांना जास्त पाणी लागत आहे. वीजकपात व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतीला वेळेत पाणी मिळत नाही. तसेच ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जास्तीचे क्षेत्र व उशिरा सुरू झालेला गळीत हंगाम यामुळे ऊस शिल्लक आहे. ऊस तोडणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्याकडे हेलपाटे घालावे लागत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Farmers run water for water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.