ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट

By Admin | Updated: April 17, 2015 00:11 IST2015-04-16T23:40:30+5:302015-04-17T00:11:15+5:30

तक्रारीची दखल नाही : एकरी दहा हजार आणि कोयत्यामागे एक किलो चिकन!

Farmer's robbery from the underground laborers | ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट

ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट

प्रमोद रावळ - आळसंद -खानापूर तालुक्यातील आळसंदसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड मजुरांसह सर्वांनीच लूट सुरू केली आहे. एक एकर ऊस तोडणीसाठी आठ ते दहा हजारासह वाहन एन्ट्रीच्या नावाखाली ५०० रूपये व प्रति कोयता एक किलो चिकनची मागणी केली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. शेतकरी संघटनासुध्दा शेतकऱ्यांची बाजू मांडताना दिसत नसल्यामुळे तक्रार करायची कुणाकडे?, असा प्रश्न विचारला जात आहे.
आळसंदसह बलवडी (भा.), खंबाळे (भा.), वाझर, भाळवणी, कमळापूर, तांदळगाव आदी गावात ताकारी व आरफळ योजनेमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मागीलवर्षी वसंतदादा कारखान्याने ऊसबिले दिलेली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले असतानाच, मागील माहिन्यातील अवकाळी पाऊस व त्यातच ऊसतोड मजुरांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या गळीत हंगामात सुरुवातीला कार्यक्षेत्राबाहेरचा ऊस तोडून आणला. त्यामुळे कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी संपवून साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त टोळ्या कार्यक्षेत्रात धाडल्या. सध्या आळसंद व परिसरात क्रांती, सोनहिरा, उदगिरी, केन अ‍ॅग्रो आदीसह कारखान्यांच्या १०० ते १५० ऊसतोड टोळ्यांची संख्या आहे.
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्पात असून उसाचे शिल्लक क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी चिटबॉयपासून मुकादम, ऊसतोड मजूर व वाहनचालक यांच्यापुढे हात जोडताना दिसत आहेत. याचाच फायदा ऊसतोड करणाऱ्या लॉबीने घेतला आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांना मात्र एक एकर उसाच्या तोडणीसाठी ऊसतोड मजुरांना आठ ते दहा हजार रूपये व प्रत्येक कोयत्यामागे एक किलो चिकन, वाहनचालकास ‘एन्ट्री’च्या नावाखाली प्रत्येक खेपेला ५०० रूपये हातावर ठेवल्याशिवाय वाहन फडातून बाहेर निघत नाही.
याबाबत शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाकडे तक्रारी देऊनही याची दखल घेतली नाही. तसेच शेतकरी संघटनेचे नेतेही याची दखल घेताना दिसत नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खुलेआम आर्थिक लूट सुरू आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.


नहवालदिल ऊस उत्पादक
ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले असतानाच ऊसतोड मजुरांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून चिटबॉयपासून मुकादम, ऊसतोड मजूर व वाहनचालक यांच्यापुढे हात जोडताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना एक एकर उसाच्या तोडणीसाठी मजुरांना आठ ते दहा हजार रूपये व प्रत्येक कोयत्यामागे एक किलो चिकन, वाहनचालकास ‘एन्ट्री’च्या नावाखाली प्रत्येक खेपेला ५०० रूपये हातावर ठेवल्याशिवाय वाहन फडातून बाहेर निघत नाही. कारखाना प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी देऊनही याची दखल घेतली जात नाही.

Web Title: Farmer's robbery from the underground laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.