जयंतरावांच्या भूमिकेने शेतकरी संघटना घायाळ
By Admin | Updated: September 30, 2015 00:03 IST2015-09-29T21:48:38+5:302015-09-30T00:03:57+5:30
रघुनाथ पाटील : एफआरपीसाठी जयंतरावांनीच नेतृत्व करावे

जयंतरावांच्या भूमिकेने शेतकरी संघटना घायाळ
अशोक पाटील -=इस्लामपूर -खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम मिळण्यासाठी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे, तर त्यांना शह देण्यासाठी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. केंद्र व राज्य शासन आर्थिक मदत करत नाही, तोपर्यंत हंगाम सुरू न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या सर्व राजकारणामध्ये राजू शेट्टी यांची लोकप्रियता कमी करण्याची खेळी असल्याची चर्चा ऊस उत्पादकांतून आहे.दोन वर्षांपूर्वीच्या गळीत हंगामात पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना तीन हजार रुपये दर मिळावा म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. या गळीत हंगामानंतर होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शेट्टी यांनी हे आंदोलन तापवले होते. लोकसभा निवडणूक सोपी होईल, हेही कारण त्यामागे होते. महिनाभर हे आंदोलन सुरू होते. ज्यांनी हंगाम सुरू केले, त्या कारखान्यांना ऊस नेणाऱ्या वाहनांचे नुकसानही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत होते.
त्यामुळे शेवटच्या टप्प्यात आमदार जयंत पाटील यांनी या आंदोलनात लक्ष घालून ते हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. ही खेळी शेट्टी यांच्या लक्षात येताच त्यांनी कोल्हापुरातील साखर कारखानदारांशी हातमिळवणी करून २५०० रुपयांवर तडजोड करुन आंदोलन थांबवले. यावर पुन्हा जयंत पाटील ऊस उत्पादकांना तीन हजार रुपये दर मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत गळीत हंगाम लांबणीवर टाकला. परंतु स्वत: पाटील यांनी त्यांच्या ऊस उत्पादकांना तीन हजार रुपये दर दिला नाही. यामागेही शेट्टी यांची लोकप्रियता कमी करण्याचा डाव होता.
मोदी लाटेच्या हवेवर स्वार होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपच्या युतीत सामील झाली. निवडणूक निकालानंतर सत्ता भाजपकडे गेली. त्यामुळे राजू शेट्टी यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार, या अफवेला उधाण आले. त्यामुळे त्यांनी मागील हंगामात ऊसदरासाठी कसलेही आंदोलन केले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांचे नावही मंत्रीपदासाठी पुढे येऊ लागले. त्यामुळे त्यांनी ऊस दरावर ‘ब्र’ शब्दही काढला नाही. यावर आमदार पाटील यांनी अनेक ठिकाणच्या कार्यक्रमात शेट्टी, खोत यांच्यावर टीकास्त्र सोडले. अखेरपर्यंत दोघांनाही भाजप नेत्यांनी आश्वासनापलीकडे काहीही न दिल्याने आता शेट्टी आणि खोत पुन्हा उसाच्या एफआरपीसाठी लढ्याचे कारण पुढे करून लोकप्रियता वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत.
याला खो घालण्यासाठी राजारामबापू कारखान्याच्या वार्षिक सभेत आमदार पाटील यांनी एफआरपीची रक्कम देण्यासाठी आम्हीही आग्रही आहोत, परंतु राज्य व केंद्र शासनाने मदत केल्याशिवाय हे शक्य नाही, असे सांगितले. पुढील हंगाम शासनाच्या मदतीशिवाय सुरू न करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची हवा काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
गेली दहा वर्षे आम्ही ऊस उत्पादकांच्या दरासाठी साखरसम्राटांविरोधात भांडत आहोत. एफआरपीची रक्कम एकहाती मिळावी म्हणून मी येणारा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेबद्दल माझे कोणतेही मत नाही. जयंत पाटील हेही एफआरपीची रक्कम देण्यासाठी राजी आहेत. परंतु या रकमेसाठी शासनाची मदत होणे गरजेचे आहे. संघटनेचे नेते आणि जयंत पाटील यांची भूमिका एकच आहे. त्यामुळे त्यांनीच नेतृत्व करुन एफआरपीचा प्रश्न मार्गी लावावा.
- रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना.