कडेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा हिरवळीचे खत करण्याकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST2021-05-18T04:28:16+5:302021-05-18T04:28:16+5:30
फोटो : चिंचणी (ता. कडेगाव) येथील शेतकरी केशव दत्तू पाटील यांनी आपल्या शेतात हिरवळीचे खतासाठी तागाची लावणी केली आहे. ...

कडेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा हिरवळीचे खत करण्याकडे कल
फोटो : चिंचणी (ता. कडेगाव) येथील शेतकरी केशव दत्तू पाटील यांनी आपल्या शेतात हिरवळीचे खतासाठी तागाची लावणी केली आहे.
प्रताप महाडिक
कडेगाव : रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीची सुपीकता कमी होत आहे. खतांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे जमिनीचा पोत टिकविण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी कडेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात ताग, ढेंचा, आदी हिरवळीच्या खतांची पिके घेतली आहेत. ही पिके शेतीला उपयुक्त ठरू लागली आहेत.
जमिनीला सेंद्रिय खतांची गरज भागविण्यासाठी हिरवळीची खते हा उत्तम पर्याय असल्याने याची लागवड अनेक शेतात दिसून येत आहे. शेणखत मिळाले तरी त्यासाठी मोजावी लागणारी किंमत भरमसाट आहे. तसेच यामुळे कचरा व विविध प्रकारच्या बिया शेतात पसरल्यामुळे तणाची वाढ होते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळू लागले आहेत.
चौकट
अन्नद्रव्यांची उपलब्धता
हिरवळीचे खत प्रति एकर ८० क्विंटल मिळते. यामुळे एकरी २२४ क्विंटल शेणखताएवढा फायदा शेतकऱ्यास होतो. हे खत कुजत असताना सूक्ष्म जीवाणूंची व पोषक सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. याशिवाय युरिया, स्फुरद, पोटॅश, गंधक, कॅलशिअम, मॅग्नेशिअम ही अन्नद्रव्ये आणि जस्त, लोह, मँगेनीज तांबे ही सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. असे सोनहिरा कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे कृषी सहायक रणजित जाधव यांनी सांगितले.