शेतकऱ्यांनो, तुमचा सात-बारा कोरा झाला का? जिल्ह्यातील १४३२ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी
By अविनाश कोळी | Updated: May 17, 2023 13:32 IST2023-05-17T13:32:38+5:302023-05-17T13:32:45+5:30
जिल्ह्यातील १ हजार ४३२ शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भू-विकास बँकेचा बोजा हटविण्यास सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांनो, तुमचा सात-बारा कोरा झाला का? जिल्ह्यातील १४३२ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी
सांगली : जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या (भू-विकास) शेतकरी सभासदांची कर्जमाफी शासनाने केली असून त्यांच्या जमिनीवरील बँकेचा बोजा हटविण्याचे काम गतिमान झाले आहे. आतापर्यंत सुमारे २५ टक्के सभासदांचा सात-बारा कोरा झाला आहे.
जिल्ह्यातील १ हजार ४३२ शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भू-विकास बँकेचा बोजा हटविण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला आहे. राज्यातील २९ भू-विकास बँकांकडील ३४ हजार ७८८ कर्जदारांची ९६४ कोटी १५ लाखांची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने मागील वर्षी घेतला होता. या निर्णयानुसार ९ नोव्हेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
यादीत नसलेल्यांनाही लाभ
यापूर्वी कर्ज परतफेड केल्यानंतरही ज्यांच्या सात-बारावर बँकेचे नाव नजरचुकीने राहून गेले आहे, अशांचा बोजाही कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या दीड हजारावर जाण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय सभासद तालुका सभासद
मिरज २८८
क. महांकाळ ६९
तासगाव २४८
पलूस ६७
वाळवा ११७
शिराळा ३९३
जत १४९
कडेगाव २६
आटपाडी ६३
खानापूर १२
एकूण १४३२
२ हजार २४३ हेक्टरवरील बोजा हटणार
जिल्ह्यातील एकूण १ हजार ४३२ शेतकऱ्यांचे एकूण १३३ कोटी ४३ लाखांचे कर्ज माफ झाले असून त्यांच्या २ हजार २४३ हेक्टर जमिनींवरील बँकेचा बोजा आता हटणार आहे.
आमचा बोजा हटला
तलाठी कार्यालयाकडून आमच्या जमिनीवरील बोजा हटल्याचे सांगण्यात आले आहे. फेरफार उतारा व नवा सातबारा उतारा येत्या चार दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. गतीने हे काम सुरु आहे. गावातील २५ सभासदांच्या जमिनीवरील बोजा हटला आहे.
- बाबा पाटणे, शेतकरी, कवठेएकंद