वाळव्यातील शेतकरी मराठवाडा दौऱ्यावर
By Admin | Updated: May 30, 2016 00:49 IST2016-05-29T23:14:02+5:302016-05-30T00:49:43+5:30
दुष्काळग्रस्तांना दिलासा देणार : पाणी, शेतीविषयक जागृती करणार
वाळव्यातील शेतकरी मराठवाडा दौऱ्यावर
इस्लामपूर : दुष्काळाने होरपळत असणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच, पाणी, शेती, जमीन, मातीबद्दल अधिक जाणीव-जागृती करण्यासाठी राजारामबापू पाटील सह़ साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील गावा-गावातील ८५ शेतकऱ्यांना तीन दिवसांसाठी मराठवाड्यात पाठविले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौरा करून आल्यानंतर त्यांनी राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांना ही सूचना केली होती़
राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना निरोप दिला़ आपणास कृष्णामाईचे वरदान लाभले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी ३0-३२ वर्षापूर्वी आपल्या शिवारात पाणी आणल्याने आपणास दुष्काळाच्या झळा कमी बसल्या़ निसर्गाची साथ न मिळाल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला आहे़ दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्या या आपल्या शेतकरी बांधवांना आधार द्या.
कडक उन्हाळ्यात तेथील शेतकरी कसा जगतो, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असतानाही तेथील शेतकरी उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी व शेतीसाठी कसा वापर करतो, हे बघा, असा संदेश विजयबापू पाटील व आऱ डी़ माहुली यांनी शेतकऱ्यांना दिला़
राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे शेतकरी व अधिकारी पंढरपूर, उस्मानाबाद, परळी, बीड, जामखेड परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत तेथील तापमान, शेती, पीकपध्दती, पाण्याचे दुर्भिक्ष्य, पाण्याचे स्रोत, पावसाचे प्रमाण आदी बाबींची माहिती घेणार आहेत़ हा दौरा तीन दिवसांचा आहे़
याप्रसंगी व्यवस्थापकीय अधिकारी व्ही़ बी़ पाटील, शेती विभागाचे गटाधिकारी नितीन पाटील, संग्राम पाटील, महेश कदम, क्लार्क विजय कुलकर्णी, तसेच बोरगावचे टी़ आऱ सलगर, नागावचे सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्तेल पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघालेल्या वाळवा तालुक्यातील शेतकरी व अधिकाऱ्यांना राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, आऱ डी़ माहुली, व्ही़ बी़ पाटील यांनी निरोप दिला.