आठवडा बाजाराच्या बंदमुळे शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:07+5:302021-04-02T04:27:07+5:30
कसबे डिग्रज : जिल्हा प्रशासनाने ग्रामीण व शहरी भागातील आठवडा बाजार बंद केले आहेत. यामुळे भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना ...

आठवडा बाजाराच्या बंदमुळे शेतकरी संकटात
कसबे डिग्रज : जिल्हा प्रशासनाने ग्रामीण व शहरी भागातील आठवडा बाजार बंद केले आहेत. यामुळे भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा निर्णय स्थगित करून आठवडा बाजार सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी पंचायत समिती सदस्या जयश्री डांगे यांनी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यासह सगळीकडे कोरोनाचे थैमान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षी मोठा लॉकडाऊन पाळण्यात आलेला होता. या गंभीर परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग आर्थिक संकटाला सामोरे गेला आहे. यंदा शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात शेतामध्ये भाजीपाला पिकवलेला आहे. परंतु आठवडा बाजार बंद करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा हा माल शेतामध्ये पडून राहणार आहे. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. अशातच लॉकडाऊनच्या अफवेने दलालांकडून दर पाडले जात आहेत. आठवडा बाजार बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा प्रशासनाने आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जयश्री डांगे यांनी केली आहे.