सांगलीवाडीजवळ शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:39+5:302021-02-07T04:24:39+5:30
किसान संघर्ष समन्वय समितीचे महेश खराडे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, डॉ. ...

सांगलीवाडीजवळ शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’
किसान संघर्ष समन्वय समितीचे महेश खराडे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, डॉ. राजेंद्र कवठेकर, संजय बेले, बाबा सांद्रे, शेवंता वाघमारे, वसीम मुजावर, सुदर्शन वाडकर, मनोज उपाध्ये, सतीश मोहिते, प्रशांत सदामते, सौरभ पाटील, महेश जगताप, निखिल कारंडे, सुमित चव्हाण, संतोष गडदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लक्ष्मी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. आष्टा आणि सांगली अशा दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना रस्त्यावरून हटविले. मागणीचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, असे आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केले. वाहतूक कोंडी होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, अशी सूचना दिली. त्यामुळे दहा मिनिटातच आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
चौकट
शत्रू सैन्यापेक्षाही वाईट वागणूक शेतकऱ्यांना
महेश खराडे म्हणाले, केंद्र सरकारने कुणालाही विचारात न घेता घाईगडबडीने कृषी कायदे संमत केले, पण त्यांना देशभर विरोध होतो आहे. कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे अडीच महिने आंदोलन सुरू आहे. पण केंद्र सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करते आहे. शत्रू सैन्यापेक्षाही वाईट वागणूक शेतकरी आंदोलकांना दिली जात आहे.
चौकट
घोषणांनी परिसर दणाणला
केंद्रातील सरकारचा धिक्कार असो, कृषी कायदे रद्द करा, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी, वर पाय, अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता.