हळद आवक वाढल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना फटका

By Admin | Updated: June 23, 2014 00:51 IST2014-06-23T00:37:31+5:302014-06-23T00:51:41+5:30

जिल्ह्यातील स्थिती : बारा महिने हंगाम; दोन लाख पोती शिल्लक राहिल्याने चिंता

Farmers and traders hurt due to rise in turmeric | हळद आवक वाढल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना फटका

हळद आवक वाढल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना फटका



अंजर अथणीकर, सांगली : गेल्या तीन वर्षांपासून हळदीचे उत्पादन वाढण्याबरोबरच शिल्लक साठ्यात वाढ झाल्याने ऐन हंगामात हळदीचा दर घसरल्याने शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. हळद साठवणुकीचाही प्रश्न आता गंभीर झाला आहे. आगामी काळात हळदीचे क्षेत्र कमी झाले, तरच शिल्लक हळदीचा प्रश्न मिटणार आहे.
सांगलीची बाजारपेठ हळदीची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. २०११ मध्ये हळदीला उच्चांकी दर मिळाल्यानंतर हळदीचे गणित बिघडले आहे. २०११ मध्ये हळदीचा दर तब्बल २१ हजार रुपये क्विंटल इतका विक्रमी झाला होता. त्यानंतर हळदीच्या लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढल्याने हळदीचे गणित बिघडले. सांगलीमध्ये स्थानिक परिसरातून २५ टक्के, तर आंध्र प्रदेश व तामिळनाडूमधून सुमारे ७५ टक्के हळदीची आवक होत असते. सर्वसाधारणपणे ७ ते ८ लाख पोती (एक पोते ७० ते ८० किलो) हळदीची सांगलीच्या बाजारपेठेत आवक होत असते. हळदीच्या बाजारपेठेचा हंगाम जानेवारी ते जुलैअखेर चालतो. जानेवारी ते मे अखेर सुमारे ७ लाख पोत्यांची आवक झाली असून, जुलैअखेर आणखी २ लाख पोत्यांची आवक होण्याची शक्यता आहे. यावर्षीही सुमारे वीस टक्के हळदीची आवक वाढली आहे.
सांगली परिसरातील गोदाम, कोल्ड स्टोअरेजमध्ये १ लाख ८० हजार पोती शिल्लक असून, हरिपूरच्या शंभर पेवांमध्ये सुमारे तीस हजार पोती हळद शिल्लक आहे. शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही आता गोदाम व कोल्ड स्टोअरेजचे भाडे परवडणारे नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदाम व पेवांमधील हळदीलाही आता डंख लागत आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी यांची हळद विक्रीसाठी धडपड सुरू आहे. सांगलीच्या हळदीची संपूर्ण देशाबरोबरच परदेशातही निर्यात होते.
सध्या हळदीचा दर ४ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये क्विंटल आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या ऐन हंगामात हळदीचा दर दीड हजार ते दोन हजार रुपयांनी उतरला आहे. गतवर्षी जूनमध्ये हळदीचा दर सहा हजार ते ९ हजार रुपये क्विंटल होता. यावर्षी दर उतरला असून, आगामी मान्सूममध्ये हळदीची लागवड कमी झाली तरच हळदीचे दर स्थिरावण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Farmers and traders hurt due to rise in turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.