मेंढेगिरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:00+5:302021-01-08T05:28:00+5:30
जत : मेंढेगिरी (ता. जत) येथील बाळाप्पा शिवगोंडा बिराजदार (वय ५५) या शेतकऱ्याचा शेततलावाच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून गुदमरून मृत्यू ...

मेंढेगिरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून शेतकरी ठार
जत : मेंढेगिरी (ता. जत) येथील बाळाप्पा शिवगोंडा बिराजदार (वय ५५) या शेतकऱ्याचा शेततलावाच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून गुदमरून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी रात्री उशिरा जत पोलिसांत नोंद झाली आहे.
मेंढेगिरी ते उंटवाडी रस्त्यावर मेंढेगिरीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर बिराजदार यांची शेतजमीन आहे. ते पत्नी, चार मुली व मुलगा यांच्यासमवेत शेतजमिनीतील घरात राहत होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तलावाचा बांध फोडून त्यातील पाईप काढण्याचे काम ते एकटेच करीत होते. पाईप बाजूला काढत असताना अचानक शेततलावाच्या बांधाच्या मातीचा ढिगारा त्यांच्या डोक्यावर व अंगावर पडल्याने त्याखाली गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना काही वेळाने कुटुंबातील सदस्यांना समजल्यानंतर त्यांनी माती उकरून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मेंढेगिरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.