शेतकरी चार महिने भरपाईच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: March 17, 2015 00:06 IST2015-03-16T23:06:58+5:302015-03-17T00:06:40+5:30
जत पूर्व भाग : द्राक्ष, डाळिंब बागायतदार हवालदिल; पंचनाम्यांचा नुसताच फार्स...

शेतकरी चार महिने भरपाईच्या प्रतीक्षेत
राहुल संकपाळ - उमदी जत पूर्व भागात नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जत पूर्व भागातील उमदी, हळ्ळी, बालगाव, बोर्गी, मोरबगी, करजगी, बेळोंडगी, सोनलगी, सुसलाद, माणिकनाळ अशा अनेक गावांतील द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बागांचे ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकारी यांनी पंचनामे केले. परंतु पंचनामे करून व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन चार महिने पूर्ण झाले तरी, अद्याप शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी बागा जगविण्यासाठी बॅँकेकडून अथवा सावकारांकडून कर्जे काढली आहेत. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच मार्चअखेर असल्याने अनेक बॅँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावला आहे. एकीकडे पिकांचे नुकसान, तर दुसरीकडे कर्जफेड, या गोष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी नुकसान भरपाईची प्रतीक्षा करीत आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक लहान-मोठ्या मागण्यांसाठी अनेक राजकीय नेते व पक्ष रस्त्यावर उतरले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र, शेतकऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील जत पूर्व भागातील एकही राजकीय पक्ष अथवा नेता याबद्दल बोलून रस्त्यावर उतरायला तयार नाही. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी पंचनामे तयार केले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई लवकर द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
नेतेमंडळींची पाठ...
निवडणुकीपूर्वी अनेक लहान-मोठ्या मागण्यांसाठी अनेक राजकीय नेते व पक्ष रस्त्यावर उतरले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र, शेतकऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील जत पूर्व भागातील एकही राजकीय पक्ष अथवा नेता याबद्दल बोलून रस्त्यावर उतरायला तयार नाही.