कुटुंब वत्सल.. सुसंस्कृत.. कर्तृत्वान, साहेब !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:05+5:302021-02-15T04:23:05+5:30

युवानेते साहेब, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी अमेरिकेतील उच्चशिक्षण सोडून सार्वजनिक जीवनात आले. बघता बघता ३७-३८ वर्षांचा काळ कधी लोटला ...

Family Vatsal .. cultured .. hardworking, sir !! | कुटुंब वत्सल.. सुसंस्कृत.. कर्तृत्वान, साहेब !!

कुटुंब वत्सल.. सुसंस्कृत.. कर्तृत्वान, साहेब !!

युवानेते

साहेब, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी अमेरिकेतील उच्चशिक्षण सोडून सार्वजनिक जीवनात आले. बघता बघता ३७-३८ वर्षांचा काळ कधी लोटला कळलेही नाही. या कालावधीत त्यांनी बापूंनी उभा केलेल्या सहकारी संस्था सक्षमपणे पुढे नेत बापूंच्या इतकाच तालुक्यातील जनतेला जीव लावला आहे. राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान केले. मला त्यांचा मुलगा म्हणून याचा सार्थ अभिमान आहे. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना त्यांनी कुटुंब म्हणून आम्हास वेळ दिला आहे. कुटुंबप्रमुख म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. साहेब हे कुटुंब वत्सल आहेत.

साहेबांनी २१व्या वर्षी बापूंच्या विचाराने वाळवा तालुक्यात गावोगावी पदयात्रा काढून शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देत साखर कारखान्याच्या माध्यमातून ३७ सहकारी पाणीपुरवठा संस्था उभ्या केल्या, हे साहेबांचे काम वाळवा तालुक्याच्या विकासाचा पाया ठरले आहे. साहेबांचे हे काम राज्यात अद्वितीय असे आहे. आजचा समृद्ध, श्रीमंत वाळवा तालुका ही ओळख पाणीपुरवठा संस्थांच्या उभारणीतून निर्माण झाली आहे. साहेबांनी ३८ वर्षांच्या कालखंडात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राज्य साखर संघाचे अध्यक्ष तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री, गृहमंत्री व ग्रामविकासमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे. सध्या ते राज्याचे जलसंपदामंत्री, सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. साहेब राज्य पातळीवर प्रदीर्घ काळ कार्यरत तसेच वाळवा तालुक्यातील अनेक राज्यातील अग्रगण्य सहकारी संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत आहेत, तरीही इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या पांढऱ्या कपड्यावर एकही डाग नाही, ही आपणा सर्वांना अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी आपल्या कामातून वाळवा तालुक्यातील जनतेची मान कायम उंचविलीच आहे. राज्यातील एक उच्चशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू, शांत, संयमी नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी बापूंचा जनसेवेचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेताना आपल्या कुटुंबासही वेळ दिला आहे. त्यांनी आम्हाला उच्चशिक्षण देताना, आमच्यावर चांगले संस्कारही केले आहेत.

आपल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे अशी प्रत्येक वडिलांची अपेक्षा असते. साहेबांची तशी अपेक्षा माझ्याबद्दल व राजवर्धनबद्दल होती. ते नेहमी सांगायचे खूप शिका, मोठे व्हा. बापू पप्पांना, काकांना (भगतदादा पाटील) म्हणायचे, ‘चांगले शिका. नाही तर कासेगावला जाऊन म्हशी राखाव्या लागतील.’ तसेच साहेबही मला व राजवर्धनला म्हणायचे, 'चांगले शिका नाहीतर, कासेगावला जावून शेती करावी लागेल.' सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, समस्या खोलात जावून समजून घेत त्यांना मदतीचा हात द्यायला हवा, ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे.

मी हायस्कूलमध्ये शिकत असताना, अभ्यास कमी करायचो. दरवर्षी हेडमास्तर पालकांना शाळेत बोलावून मुलांचा अभ्यासाचा रिपोर्ट द्यायचे. साहेब दरवर्षी वेळ काढून यायचे, आमचा वार्षिक रिपोर्ट समजून घ्यायचे. त्यांना जिथे आम्ही कमी वाटायचो, ते व्यवस्थित करायला आम्हाला प्रोत्साहित करायचे. माझा सायन्स हा विषय कच्चा होता. साहेब आपली कामे आटपून वेळ काढायचे. ते मला सायन्स विषय शिकवायचे. मला आठवते, केमिस्ट्रीतील पॅरॉडिकल टेबल मला त्यांनी शिकविली आहेत. आपल्या मुलांचा कोणताही विषय कच्चा राहू नये, त्यांनी सर्व विषयात पारंगत असावे, ही एका वडिलांची तळमळ त्यामागे होती. आमच्या क्रिकेटच्या मॅचेस असायच्या. पप्पा मंत्रालयातील कामे आटपून मुद्दाम वेळ काढून मॅचेस पहायला यायचे. मागे बसून ते आमचा खेळ पहायचे. मला जवळ बोलावून मॅचचे अपडेट घ्यायचे. ते आमच्या खेळाचे कौतुक करायचे.

आम्ही इस्लामपूरला विशेषत: मुंबईला असताना साहेब वेळ काढून मला, राजवर्धनला बाहेर जेवायला घेऊन जातात. आम्ही वेळ मिळेल तेव्हा, घरी टीव्हीवर पिक्चर पाहतो. काही वेळा ते आम्हाला आइस्क्रीम खायला घेऊन जातात. ते वडील म्हणून आम्हाला वेळ देतात.

सार्वजनिक जीवन असो, अथवा व्यवसाय. तुम्ही स्वत:च्या कामातून उभे राहायला हवे, अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. स्व. बापूंच्या अकाली जाण्याने साहेब सार्वजनिक जीवनात आले. ते वाळवा तालुका व तालुक्यातील जनतेच्या सुख-दु:खाशी समरस झाले. लोकांचे प्रश्न, समस्या समजून घेत त्या सोडविण्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी वाळवा तालुक्याच्या जनतेच्या जीवनात समृद्धी आणताना राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे, देत आहेत. ते जे काम करीत आहेत, त्याच कामात आम्हालाही आवड निर्माण झाली आहे. तेच काम आम्ही करीत आहोत. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून त्यासाठी झोकून देऊन काम केल्यास आपण नक्की यश मिळवू, असा संदेश आम्ही त्यांच्या कडून घेतला आहे.

साहेब, राज्याचे जलसंपदामंत्री आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने राज्यात फिरावे लागत आहे. इकडे इस्लामपूरला मतदारसंघातील लोक, जिल्ह्यातील लोक त्यांना भेटायला येतात. मी आता साहेबांना मदत करण्याचे काम करीत आहे. लोकांना भेटण्याचा, लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या व्यवसाय करीत समाजकारण शिकत आहे. यामध्ये राजकारण हा दुसरा मुद्दा आहे.

साहेबांच्या हातून राज्यातील जनतेची अधिकाधिक सेवा घडो, या त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

शब्दांकन- विश्वनाथ पाटसुते

प्रसिद्धी अधिकारी फोटो - १४०२२०२१-आयएसएलएम-प्रतीक पाटील लेख

Web Title: Family Vatsal .. cultured .. hardworking, sir !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.