फरारी ठकसेनास अखेर मिरजेत अटक
By Admin | Updated: February 28, 2016 00:26 IST2016-02-28T00:26:36+5:302016-02-28T00:26:36+5:30
महिलांना गंडा : पेन्शनचे आमिष

फरारी ठकसेनास अखेर मिरजेत अटक
मिरज : मिरजेत झोपडपट्टीतील महिलांना निराधार पेन्शन योजनेचे व शासकीय कर्जाचे आमिष दाखवून हजारो रुपयांना गंडा घालणाऱ्या विशाल चारूदत्त करोले (वय ३२, रा. झारीबाग) यास पोलिसांनी अटक केली. करोले याच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरारी होता.
विशाल करोले याने भीमनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या आपरुखाबाई ईश्वर गडहिरे या वृध्देस निराधार पेन्शन सुरू करण्याच्या भूलथापा देऊन त्यांच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची बोरमाळ काढून घेऊन पलायन केले. गडहिरे यांच्या शेजारी राहणाऱ्या दीपाली शेसवरे यांच्याकडून निराधार पेन्शन सुरू करण्यासाठी दोन हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी विशाल करोले याच्याविरुध्द आपरुखाबाई गडहिरे या वृध्देने फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
विशाल करोले याने कृष्णाघाट रोड व झारीबाग परिसरातील महिलांचीसुध्दा अशाचप्रकारे फसवणूक केली आहे. झारीबाग येथे नसिम हसन गाडद या महिलेकडून शासकीय योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी करोले याने दहा हजार रुपये लुबाडले.
कृष्णाघाट रस्त्यावरील द्रौपदी आवळे यांच्याकडून पाच हजार व अनिता निकम यांच्याकडून तीन हजार रुपये उकळल्याची तक्रार गांधी चौक पोलिसात देण्यात आली आहे. फसवणूकप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर करोले फरारी झालेल्या करोले यास शहर पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.