सोशल मीडियावर बनावट अकाऊंट; पाच तक्रारी दाखल, आठवड्यात निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:14+5:302021-07-05T04:17:14+5:30
सांगली : सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन अनेकांना गंडा घालण्याबरोबर संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचे प्रकार कोरोना काळात वाढत ...

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट; पाच तक्रारी दाखल, आठवड्यात निपटारा
सांगली : सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन अनेकांना गंडा घालण्याबरोबर संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचे प्रकार कोरोना काळात वाढत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जिल्हा पोलीस दलात स्वतंत्र सायबर सेल सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होत असत. गेल्या पाच महिन्यांत सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक करण्यापासून बनावट अकाऊंटच्या ५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. काही तक्रारींबाबत चाैकशी सुरू आहे. यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करणे, व्हाॅट्सॲपचे अकाऊंट हॅक करणे या तक्रारींचा समावेश आहे. तसेच सायबर क्राईमशी संबंधित मे अखेरपर्यंत २६ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी अनेक तक्रारींवर कारवाई झाली आहे. इतर तक्रारींची चाैकशी सुरू आहे.
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून भावनिक साद घालत पैसे उकळण्याचे प्रकार घडतात. फ्रेंड लिस्टमधील सदस्य पैसे पाठवतात. त्यामुळे नुकसान होते. युजर्सनी यामुळे सतर्क राहिले पाहिजे.
चौकट
सात दिवसांनंतर होते खाते बंद
तक्रार केल्यानंतर सात दिवसात खाते बंद होते, असा आजवरचा अनुभव आहे.
सायबर सेलकडे तक्रार आल्यावर पोलीस नोटीस पाठवतात. नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करतात.
परंतु, युजरने स्वत: आपल्या अकाऊंटवरून तक्रार केली तर चोवीस तासांच्या आत बनावट खाते बंद केले जाते.
चौकट
तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर...
आपल्या नावाने बनावट अकाऊंट दिसले तर सर्वप्रथम अकाऊंट फेक आहे की हॅक झाले आहे, याची खात्री करावी. घाबरुन न जाता त्वरित सायबर सेलशी संपर्क साधावा.
फेक अकाऊंट युजर स्वत: बंद करू शकतात. युजरने स्वत: रिपोर्ट केले तर चोवीस तासांच्या आत अकाऊंट बंद होते. रिपोर्ट करण्याची प्रोसेस समजून घ्यावी.
फेक अकाऊंटची प्रोफाईल युआरएल लिंक काॅपी करून आपल्या अकाऊंटवरून तक्रार दाखल करावी. त्वरित कारवाई होते आणि अकाऊंट बंद केले जाते.
ही प्रोसेस कंपनीच्या वेबसाईटवर समजून घेता येऊ शकते किंवा सायबर सेलशी संपर्क साधल्यास त्यांच्याकडूनही सविस्तर माहिती मिळू शकते.
सायबर सेलमार्फत सूचना
पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हे सध्या या विभागाचे काम पाहत आहेत. क्षीरसागर म्हणाले की, ओटीपी वरून होणारे फ्रॉड यांच्यासोबतच सध्या फेसबुक द्वारे होणारे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सदरची फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारणे, अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग न करणे, आपली सेक्युरिटी सेटिंग प्रायव्हेट ठेवणे, कोणत्याही मागणी अथवा भूलथापांना बळी न पडणे आवश्यक आहे.
कोरोना काळामध्ये वाढल्या तक्रारी
कोरोना आणि लाॅकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे गुन्हे वाढले आहेत.
पाच महिन्यांत तब्बल २६ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे सायबर सेल अलर्ट झाला आहे.
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युजर्सनीदेखील सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चौकट
सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी
२०१७ ३२
२०१८ ४०
२०१९ ३७
२०२१
मेअखेर २६