दुष्काळी शेतकऱ्यांप्रश्नी शासनाला अपयश
By Admin | Updated: May 22, 2015 00:12 IST2015-05-21T23:17:23+5:302015-05-22T00:12:55+5:30
रामदास आठवले : विटा येथे आयोजित रिपाइंच्या संघर्ष मेळाव्यात प्रतिपादन

दुष्काळी शेतकऱ्यांप्रश्नी शासनाला अपयश
विटा : खानापूर, आटपाडी या दुष्काळी तालुक्यातील लोकांना न्याय द्यायचा असेल, तर प्राधान्याने अपूर्ण टेंभू जलसिंचन योजना शासनाला पूर्ण करावी लागेल. राज्यात केवळ १६ टक्के सिंचन, तर ८४ टक्के कोरडवाहू परिस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांना ताकदीने उभे करण्यात आम्हाला अपयश आले असल्याची कबुली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी दिली. शासनाने नवीन जलसिंचन योजना पाच ते १० वर्षांत पूर्ण केल्या तरच कमी निधीत पूर्ण होतील, असा सल्लाही खा. आठवले यांनी सरकारला दिला.
येथे गुरुवारी रिपाइंच्यातीने दलित बहुजन दुष्काळग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आयोजित संघर्ष मेळाव्यात खा. आठवले बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, विजय बारशिंग, सुरेश बारशिंग, प्रा. शहाजी कांबळे, अविनाश कांबळे उपस्थित होते.
खा. आठवले म्हणाले की, दलितांवर आजही मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. परंतु, केवळ दलितांवरील अत्याचारासाठी संघर्ष न करता कार्यकर्त्यांनी सर्व धर्मातील व जातीतील लोकांवर होणाऱ्या अत्याचारासाठीही संघर्ष केला पाहिजे. कोणत्याही एका जातीवर राजकारण होत नाही. आरपीआयला कधीच सत्ता मिळत नाही. परंतु, आम्ही सत्ता किंवा मंत्रिपदासाठी राजकारण करीत नसून, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राजकारण करीत आहोत.
रिपाइंची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी आम्ही ब्राह्मणांविरोधात नसून, रिपाइंची भूमिका जातीच्या पलीकडची असल्याचे सांगितले. संघर्ष समतेसाठी व माणसे जोडण्यासाठी असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आगामी काळात रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळ व पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहनही यावेळी खा. आठवले यांनी केले.
खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जगन्नाथ ठोकळे, सुरेश बारशिंग, प्रा. शहाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुभाष धेंडे, अशोक कांबळे, अरुण आठवले, विलास खरात, अविनाश कांबळे, संपत कांबळे, रवींद्र लोंढे, अशिष काळे, नानासाहेब वाघमारे उपस्थित होते. बाबासाहेब कांबळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
मंत्रीपद माझं!
केंद्रात भाजपला सत्तेत आणण्याचे काम आम्ही केले आहे. कधीही न मिळणारी दलितांची मते पहिल्यांदाच भाजपला मिळाली; परंतु, केंद्रातील मंत्रीपद अद्यापही मिळाले नाही. माझे मंत्रीपद पंतप्रधान मोदी यांच्या हातात आहे. त्यांनी दिले तर मंत्रीपद मिळेल. परंतु, मला मंत्रीपद मिळो अगर न मिळो, मी मात्र समाजासोबत कायम राहणार आहे. मंत्रीपद पाच वर्षांनी जाते. कार्यकर्ता हे पद निरंतर राहत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मंत्रीपद माझं!
केंद्रात भाजपला सत्तेत आणण्याचे काम आम्ही केले आहे. कधीही न मिळणारी दलितांची मते पहिल्यांदाच भाजपला मिळाली; परंतु, केंद्रातील मंत्रीपद अद्यापही मिळाले नाही. माझे मंत्रीपद पंतप्रधान मोदी यांच्या हातात आहे. त्यांनी दिले तर मंत्रीपद मिळेल. परंतु, मला मंत्रीपद मिळो अगर न मिळो, मी मात्र समाजासोबत कायम राहणार आहे. मंत्रीपद पाच वर्षांनी जाते. कार्यकर्ता हे पद निरंतर राहत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.