मोदींनी कौतुक केल्याने फडणवीस, चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यास महत्त्व नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:42+5:302021-05-10T04:25:42+5:30
सांगली : कोरोना नियंत्रणासाठी देशातील इतर राज्यांच्या मानाने चांगले काम करत आहे. तरीही विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. मुळात ...

मोदींनी कौतुक केल्याने फडणवीस, चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यास महत्त्व नाही
सांगली : कोरोना नियंत्रणासाठी देशातील इतर राज्यांच्या मानाने चांगले काम करत आहे. तरीही विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता राज्यातील काम उत्कृष्ट असल्याचे सांगितल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे काय बोलतात याला काही महत्त्व उरले नाही, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाविषयक आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असलातरी त्याचा सामना करत उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासन प्राधान्याने काम करत आहे. आजमितीला राज्यभरात ऑक्सिजनचा योग्य पुरवठा, रेमडेसिविरचा इंजेक्शनची मागणीची पूर्तता करण्यात येत आहे. रेमडेसिविरचा पुरवठा करण्याचे अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात आहेत. तरीही राज्य शासन अधिक इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविषयक करत असलेल्या लढाईचे आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कौतुक केले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असतानाही त्यांनी उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. विरोध करतानाही तो सूत्रबद्ध असला पाहिजे. मात्र, भाजपचा विरोध असा वाटत नाही, असेही ते म्हणाले.
चौकट
परदेशातील मदत केव्हा मिळणार
देशातील कोरोना नियंत्रणासाठी जगभरातून मदत येत आहे. विमाने भरून येणाऱ्या या मदतीतील मदत महाराष्ट्राला मिळणेही अपेक्षित आहे. मात्र, अद्याप ती मिळाली नाही. केंद्र दुजाभाव करते, असे म्हणणार नाही; पण आलेल्या मदतीतील योग्य वाटा महाराष्ट्रालाही देण्यात यावा, अशी अपेक्षा असल्याचे जयंत पाटील म्हणाले.