जतच्या स्मशानभूमीत सुविधांची वानवा...
By Admin | Updated: March 18, 2015 00:06 IST2015-03-17T23:22:42+5:302015-03-18T00:06:35+5:30
पालिकेचे दुर्लक्ष : अंत्यसंस्कार करणे जिकिरीचे

जतच्या स्मशानभूमीत सुविधांची वानवा...
जत : येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बसविण्यात आलेल्या जाळीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होत आहेत.जत शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार इतकी आहे. विजापूर ते गुहागर राज्यमार्गालगत जत शहराच्या बाहेर हिंदू स्मशानभूमी आहे. येथे दोन ठिकाणी पत्राशेड आहे. एका पत्राशेडमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणारी जाळी बसविण्यात आली आहे, पण दुसऱ्या शेडमध्ये जाळी बसविण्यात आलेली नाही. जाळी असल्यामुळे व्यवस्थित लाकडे ठेवून अंत्यसंस्कार करणे सोयीचे होते, तर जाळी नसल्यामुळे लाकडे व्यवस्थित ठेवता येत नाहीत. काहीवेळा मृतदेह अर्धवट जळतात. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यता असते. जाळी नसल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतदेहाचे पूर्ण दहन होईपर्यंत त्यांच्या नातेवाईकांना स्मशानभूमीत बसून रहावे लागत आहे.
स्मशानभूमीच्या सभोवताली दगडी संरक्षक भिंत बांधून त्याला मुख्य प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. सतत पाणीपुरवठा व लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही भुरटे चोर येथील जाळीची रात्री-अपरात्री चोरी करीत आहेत. तसेच काही उपद्रवी लोक पाण्याची पाईपलाईन फोडून पाणीपुरवठा खंडित करीत आहेत. नगरपालिका प्रशासनाने येथे दिवसभर सुरक्षारक्षक नियुक्त करून भुरटे चोर आणि उपद्रवी नागरिकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु रात्री सुरक्षा रक्षक नसल्याने चोरटे रात्री जाळी चोरून नेत होते. नगरपालिका प्रशासनाने यासंदर्भात जत पोलिसात तक्रारही केली आहे. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
हिंदू स्मशानभूमीच्या समोरच आता नागरी वसाहत तयार झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने येथे पूर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करून, मृतदेहांची होत असलेली हेळसांड कमी करावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)