आंतरजिल्हा बदली न दिल्यास तीव्र आंदोलन : विनायक शिंदे
By Admin | Updated: February 19, 2015 23:37 IST2015-02-19T23:16:33+5:302015-02-19T23:37:15+5:30
प्रलंबित मागण्या

आंतरजिल्हा बदली न दिल्यास तीव्र आंदोलन : विनायक शिंदे
सांगली : सांगली जिल्हा परिषदेतून इतर जिल्ह्यात बदली होणाऱ्या शिक्षकांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत होती. पण अद्यापही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सोमवार दि. २३ पर्यंत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना ना हरकत न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघ (थोरात गट)चे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिला. राज्य शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी ना हरकत देण्यास १० फेब्रुवारीपर्यंत बंधनकारक होते. याबाबतचे आदेश २९ आॅक्टोबर रोजीच देण्यात आले होते. या कालावधित एनओसी मिळाली नाही, तर अन्य जिल्हा परिषदेत त्यांना स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे शिक्षकांची गैरसोय होणार आहे. वेळेत एनओसी न मिळाल्याने या शिक्षकांना ज्येष्ठतेस मुकावे लागणार आहे. याबाबत शिक्षक संघाने वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाने दखल घेतलेली नाही. प्रत्येकवेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा लागतो. शिक्षण विभागाच्या सुस्तावलेल्या कारभाराबद्दल शिक्षकांत नाराजी आहे. शिक्षकांची कामे वेळेत होत नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेत हेलपाटे मारावे लागतात.
शिक्षण विभागाच्या कामात सुधारणा न झाल्यास २३ फेब्रुवारीनंतर संघाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
प्रलंबित मागण्या
फेब्रुवारी महिना संपत आला तरी अद्याप सुट्ट्यांची यादी मिळालेली नाही. अनट्रेंड शिक्षकांचे शंभर टक्के नियमितीकरण पूर्ण झालेले नाही. केंद्रप्रमुखांना १६५० रुपये फिरती भत्ता देण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. अपंग शिक्षकांना वाहन खरेदी अनुदान, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. माध्यमिक शाळांप्रमाणे प्राथमिक शाळाही एक मार्चपासून सकाळच्या सत्रात घ्याव्यात, अशी मागणीही शिंदे यांनी केली.