निवडणुकीमुळे बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
By Admin | Updated: October 14, 2014 23:26 IST2014-10-14T22:56:47+5:302014-10-14T23:26:48+5:30
२१ पर्यंत मुदतवाढ : शिक्षण मंडळाचा निर्णय

निवडणुकीमुळे बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
चिपळूण : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. ही निवडणूक संपूर्ण राज्यात उद्या (दि. १५) एकाच वेळी होत आहे. निवडणूक कामासाठी शिक्षकांनाही नेमण्यात आले असल्याने पुढील वर्षी फेब्रुवारी - मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ज्युनिअर कॉलेजमधील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक काम देण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत ८ दिवसांनी वाढविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे अनिल देशमुख आदींसह विविध मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी संघटनांनी केली होती. निवडणूक काळात शिक्षक कामकाजात सहभागी असल्याने याबाबतची मागणी लक्षात घेऊन माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
सचिव कृष्णकांत पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे विलंब शुल्क वाचणार आहे. शिक्षण मंडळाने मागणीची दखल घेत बारावी परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करण्याची मुदत तत्काळ वाढवल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)