भाळवणीतील शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट
By Admin | Updated: September 4, 2014 00:02 IST2014-09-03T23:53:45+5:302014-09-04T00:02:20+5:30
जीवितहानी टळली : एक लाखाचे नुकसान

भाळवणीतील शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट
भाळवणी : शोभेच्या दारू कामासाठी प्रसिध्द असलेल्या भाळवणी (ता. खानापूर) येथील बिरोबा फायर वर्क्स या शोभेची दारू तयार करणाऱ्या कारखान्यात आज बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. या घटनेत कारखान्याच्या छताचे पत्रे उडून गेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कारखान्यात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. या घटनेने भाळवणीत गेल्या नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या स्फोटाच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भाळवणी गावात शोभेची दारू तयार करणारे कारखाने आहेत. भाळवणी गावालगत शेळकबाव रस्त्यावरील ओढ्याच्या अलीकडे प्रल्हाद पांडुरंग कुंभार यांचा बिरोबा फायर वर्क्स हा शोभेची दारू तयार करणारा कारखाना आहे. या कारखान्यात आऊट, भुसनळे यासह अन्य शोभेची दारू तयार करण्याचे काम केले जाते. त्यामुळे कारखान्याच्या शेडमध्ये स्फोटकांचा कच्चा माल ठेवण्यात आला होता. आज बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज सुमारे २ ते ३ कि. मी. अंतरापर्यंत पोहोचला. अचानक झालेल्या स्फोटाने ग्रामस्थ भयभीत झाले. ग्रामस्थांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता, प्रल्हाद कुंभार यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. दिवसभर घटनास्थळी बघ्यांची गर्दी होती.
या स्फोटात कारखान्याच्या छताचे पत्रे पूर्ण उडून गेले, तर भिंतींना तडे गेले. तसेच कारखान्यातील साहित्यही विखुरले होते. या स्फोटात सुमारे १ लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी भाळवणी ग्रामस्थांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती पोलीस पाटील संतोष कोळी यांनी विटा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली आहे. तपास सहाय्यक पोलीस फौजदार ए. एन. वणवे करीत आहेत. (वार्ताहर)