फटाका कारखान्यात स्फोट
By Admin | Updated: November 30, 2014 00:56 IST2014-11-30T00:55:56+5:302014-11-30T00:56:29+5:30
तिघेजण गंभीर जखमी : विट्यात फटाके तयार करताना दुर्घटना

फटाका कारखान्यात स्फोट
विटा : येथील तासगाव रस्त्यावर फटाक्यांच्या कारखान्यात शोभेची दारू तयार करीत असताना झालेल्या भीषण स्फोटात तिघेजण गंभीर जखमी झाले. रियाज गुलाब तांबोळी (वय २५), बिलाल मुस्ताकहुसेन मुल्ला (२४) व साजीद नजीर शिकलगार (२५, सर्व रा. विटा) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. स्फोट इतका मोठा होता की कारखाना परिसरातील अर्धा किलोमीटरपर्यंतच्या लोकवस्तीला याचा हादरा जाणवला.
कारखान्याशेजारील इमारतींच्या काचा फुटल्या असून, एका जीपसह दोन दुचाकीही जळाल्या आहेत. या घटनेत सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना आज, शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
विटा-तासगाव रस्त्यावर भरवस्तीत मुस्ताकहुसेन मुल्ला यांचा बाबालाल फायर वर्क्स नावाने शोभेची व फॅन्सी फटाक्यांचा कारखाना आहे. आज या कारखान्यात शोभेची दारू तयार करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी दारूचा अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने नागरिक भीतीने सैरावैरा धावू लागले. शेजारच्या इमारतीच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केले.
स्फोटात कामगार रियाज तांबोळी, कारखान्याचे मालक राजू ऊर्फ मुस्ताकहुसेन मुल्ला यांचा मुलगा बिलाल मुल्ला व शेजारच्या वेल्डिंग दुकानातील साजीद शिकलगार असे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना सांगलीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत कारखान्याचे शेड व राजू नूरमहंमद मुल्ला यांची जीप, बबन मुल्ला व शाहरूख मुल्ला यांच्या दोन दुचाकी जळाल्या. विटा नगरपरिषदेच्या दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. पोलिसांनी स्फोट होताच शिवाजी चौकातच नाकाबंदी करून तासगाव रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांच्यासह पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली.
तरुणांची कार्यतत्परता...
विटा येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर सुमारे ४० ते ५० तरुणांनी जिवाची बाजी लावत गोडावूनमध्ये प्रवेश केला. त्यावेळी गोडावून व दुकानातील फॅन्सी फटाक्यांचा मोठा साठा तरुणांनी साखळी पध्दतीने उभा राहून तेथून बाहेर काढला. तसेच घरातील सिलिंडरही तरुणांनी अन्यत्र हलविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
विट्यात सहा ठिकाणी फटाक्यांचा साठा...
वाढत्या विटा शहरात फॅन्सी फटाक्यांचा जवळपास पाच ते सहा ठिकाणी साठा आहे. हा सर्व साठा भरवस्तीतच असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. भाळवणीपाठोपाठ विटा शहरातही फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटाच्या घटना घडू लागल्याने विटेकर नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. विटा शहरात फटाक्याचा कारखाना भरवस्तीतच असल्याने अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रहावे लागते.