शहरातील मोठ्या दुकानदारांना परवानगीची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:34+5:302021-06-09T04:34:34+5:30
सांगली : शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बाजारपेठेत सर्रास बिगर अत्यावश्यक दुकानेही सुरू ...

शहरातील मोठ्या दुकानदारांना परवानगीची आस
सांगली : शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बाजारपेठेत सर्रास बिगर अत्यावश्यक दुकानेही सुरू झाली आहेत. त्यात छोट्या व्यापाऱ्यांनी चोरीछुपे व्यवसाय सुरू केला आहे. अनलाॅकच्या या प्रक्रियेत मोठ्या दुकानदारांचे मात्र हाल होत आहे. या व्यापाऱ्यांच्या दुकानाचे शटर अजूनही बंदच आहे. या व्यापाऱ्यांना आता दुकाने सुरू होण्याची आस लागली आहे.
जिल्हा प्रशासनाने भाजीपाला, फळे, किराणा दुकानासह अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. सोमवारपासून ही दुकाने सुरू झाली. पण बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेत नसलेल्या काही दुकानदारांनी व्यवसाय सुरू केला आहे. मोबाईल, होजिअरी, कपडे, घरगुती साहित्याची दुकानेही सुरू झाली आहे. त्यांना परवानगी नसली तरी चोरीछुपे त्यांचा व्यवसाय सुरू आहे. या सर्वात मोठी अडचण मोठ्या दुकानदारांची झाली आहे.
मोठ्या दुकानदारांना दुकाने उघडता येत नाहीत. त्यांच्यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष असते. चोरीछुपे व्यवसाय करणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे सराफ कट्टा, कापडपेठ, मारुती रोड, हरभट रोड परिसरातील सोन्या-चांदीची दुकाने, भांडी, कपड्याची दुकाने अजूनही बंद आहेत. मोठ्या दुकानदारांचा खर्चही तितकाच मोठा असतो. कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यांचे पगार, कर्जाचे हप्ते, बँकांचे व्याज, वीज बिल, शासकीय कर असा खर्च काही कमी झालेला नाही. त्यामुळे या दुकानदारांनाही परवानगीची प्रतीक्षा लागली आहे.
चौकट
कोट
शहरातील बाजारपेठेत अनेक दुकाने सुरू झाली आहेत. नागरिकांचीही गर्दी आहे. छोट्या दुकानदारांनी विक्री सुरू केली आहे. पण मोठ्या दुकानदारांची अडचण आहे. पाॅझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषात जिल्हा तिसऱ्या टप्प्यात येतो. जिल्हाधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन मोठ्या दुकानांना परवानगी दिली पाहिजे. त्यांनी काय पाप केले आहे? - समीर शहा, व्यापारी एकता असोसिएशन
चौकट
कोट
सराफ पेठेत तीन ते चार मोठी दुकाने सोडली तर इतर छोटीच दुकाने आहेत. या छोट्या दुकानात फारशी गर्दी होत नाही. मोठे सराफ दुकानदारही नियमांची काळजी घेतात. त्यामुळे सर्वच व्यवहार सुरू केले पाहिजेत. प्रशासनाचा काय रोष आहे, हे कळत नाही. - पंढरीनाथ माने, सराफ व्यापारी