अध्यापनातलं विस्तारणारं अवकाश : अनिकेत बाळकृष्ण साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST2021-02-21T04:48:56+5:302021-02-21T04:48:56+5:30

एखादे क्षेत्र निवडून, नियोजनाच्या आखीव चौकटीतून वाटचाल करणे मला कधीच जमले नाही. आवड व समाधानाच्या एका प्रवाहाबरोबर मी प्रामाणिकपणे ...

Expanding Space in Teaching: Aniket Balkrishna Salunkhe | अध्यापनातलं विस्तारणारं अवकाश : अनिकेत बाळकृष्ण साळुंखे

अध्यापनातलं विस्तारणारं अवकाश : अनिकेत बाळकृष्ण साळुंखे

एखादे क्षेत्र निवडून, नियोजनाच्या आखीव चौकटीतून वाटचाल करणे मला कधीच जमले नाही. आवड व समाधानाच्या एका प्रवाहाबरोबर मी प्रामाणिकपणे चालत राहिलो. हजारो मुलांना माझी अध्यापनाची पद्धत भावली. त्यांच्या यशामधून मला माझ्या कामाचे समाधान मिळत गेले. स्वत:चे करिअर घडविण्याच्या अनेक संधी होत्या, तरीही दुसऱ्याच्या करिअरला आकार देण्याचे काम मी स्वीकारले आणि तेच माझेही करिअर बनले.

- अनिकेत बाळकृष्ण साळुंखे, संचालक, नालंदा करिअर अकॅडमी, सांगली

मंत्रालयात लागलेली कायमस्वरूपी नोकरी, हाती आलेले स्थिर आयुष्य सोडून अनिकेत साळुंखे यांनी सांगलीतच आवडीच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा धाडसी व अनेकांना न पटणारा निर्णय घेतला. कष्टाच्या, प्रामाणिकपणाच्या अनेक वर्षांच्या वाटचालीनंतर त्यांनी अध्यापनात विस्तारणारं स्वत:चं एक अवकाश तयार केलं. याच अवकाशात अनेकांना विविध क्षेत्रांत चमकणाऱ्या ताऱ्यांचं भाग्य प्राप्त झालं. सांगलीच्या अनिकेत साळुंखे यांचा हा प्रवास थक्क करणारा व तितकाच प्रेरणादायीसुद्धा आहे.

सांगलीत २४ जानेवारी १९९० रोजी त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांना घरच्यांसाठी कोणत्या तडजोडी कराव्या लागल्या नाहीत. सांगलीतील प्रज्ञा प्रबोधिनीमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. अकरावी, बारावीला त्यांनी शास्त्र विषय घेतला आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी घेतली. त्यानंतर बहि:स्थ विद्यार्थी म्हणून एम. कॉम. केले. नाशिक येथे सध्या अतिरिक्त पोलीसप्रमुख पदावर कार्यरत असलेल्या शर्मिला घार्गे-वालावलकर या त्यांच्या आतेबहिणीचा त्यांच्या वाटचालीवर मोठा प्रभाव आहे. प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. अकरावी, बारावीत असताना अनिकेत यांचे दोन मित्र जीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या विषयाला वारंवार गैरहजर राहायचे. एकाला विषय आवडत नव्हता, तर दुसऱ्याकडे पैशांची अडचण होती. या दोन्ही मित्रांना चुकविलेल्या तासातील अभ्यासक्रम शिकविण्याचे काम अनिकेत यांच्याकडे आले. शिक्षकांपेक्षा अनिकेत यांची पद्धत त्यांना आवडली. त्यांची त्या विषयात प्रगती झाली. अध्यापनाच्या वाटेवरचा हा पहिला अनुभव त्यांच्या याच क्षेत्रातील करिअरचा पाया घालणारा ठरला.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका संस्थेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. यानिमित्ताने त्यांना अनेक विषयांचा अभ्यास करावा लागला. कोणत्याही विषयाच्या खाेलात जाऊन तो विषय समजून घेण्याची त्यांची कला त्यांच्या अध्यापनाला अधिक प्रभावी बनवून गेली. याच वेळी त्यांनी दिलेल्या एका परीक्षेतून मंत्रालयात साहाय्यक कक्ष अधिकारीपदावर नियुक्ती झाली. ते मुंबईला गेले. मुंबईच्या दाटीवाटीच्या शहरातील शासकीय कार्यालयातील खोली त्यांची घुसमट करू लागली. त्यामुळे कोणालाही न विचारता, न सांगता त्यांनी ही नाेकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अवघ्या काही दिवसांतच मंत्रालय सोडून सांगली गाठले. कुटुंबीयांना हा निर्णय पटला नव्हता. निर्णय घेताना काेणाचा सल्ला घेत नसल्याने संभ्रमाचा प्रसंग त्यांच्यासमोर कधी उभारला नाही. अध्यापनाचा अनुभव असल्याने त्यांनी थेट या आवडीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ४० च्या बॅचपासून त्यांनी करिअर मार्गदर्शनाचे दालन खुले केले. सुरुवातीला १६ तासांहून अधिक वेळ त्यांनी अकॅडमीला दिला. सकाळी सातपासून रात्री दीड वाजेपर्यंत त्यांनी काम केले. मुलांना त्यांच्या भाषेत, सहजतेने शिकविण्याच्या पद्धतीमुळे अकॅडमीचा विस्तार होत गेला. सध्या तीनशेहून अधिक मुले या अकॅडमीशी जोडली गेली. अनेकांचे करिअर यातून घडले. अकॅडमीकडे त्यांनी कधीही उद्योग म्हणून पाहिले नाही. किती पैसे कमविले यापेक्षा संस्था व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख त्यांना अधिक भावतो. त्यामुळे अनेक अत्याधुनिक सुविधांनी त्यांचे ‘नालंदा’ नटले. अभ्यासिका, ग्रंथालय, क्लास यांची रचना त्यांनी अभ्यासाला पोषक व आधुनिक काळाशी समरूप केली. दिल्लीतील मोठ्या अकॅडमीच्या तुलनेत किमान ९० टक्क्यांपर्यंतचे दर्जात्मक शिक्षण व सुविधा देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांची पावलेही त्या दिशेने पडली आहेत. आयुष्याची जोडीदार म्हणून लाभलेल्या त्यांच्या पत्नीही अध्यापिका आहेत. सांगलीच्या कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात त्या नोकरीस आहेत. आयुष्याच्या वाटचालीत त्यांना कुटुंबामुळे कधीही तडजोड करावी लागली नाही. तरीही निवडलेल्या वाटेला कष्टाने फुलविण्याचे काम अनिकेत साळुंखे यांनी केले आणि त्यातूनच ‘नालंदा’चा बहर आज समाजात दरवळत आहे.

Web Title: Expanding Space in Teaching: Aniket Balkrishna Salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.