मिरज : मिरजेत गुरुवार पेठेतील भाजी बाजारात दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली. गुरुवार पेठेतील भाजीबाजार सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी पिटाळून लावला.
मिरजेत भाजी विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाने वारंवार दंडात्मक कारवाई, रॅपिड टेस्ट करूनही रस्त्यावर अनधिकृत बाजार भरविला जात आहे. गुरुवार पेठेत भरलेल्या बाजारात मोठी गर्दी होती. विनामास्क फिरणाऱ्या नागरिक व भाजी विक्रेत्यांच्या १४१ रॅपिड व ७१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. रॅपिड चाचणीत दोघे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. महापालिका सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी आक्रमक पावित्रा घेत अनधिकृत बाजार व बाजारात झालेली गर्दी पिटाळून लावली. गुरुवार पेठेत विनाकारण फिरणारे नागरिक व भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करुन साडेतीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.