लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मोबाईलच्या अतिवापराने तरुणपिढी शारीरिक व्याधींना आमंत्रण देत आहे. मनाची एकाग्रता कमी होण्यासह मोबाईलच्या उच्च तापमानाचा डोळ्यांवरही परिणाम होतो. त्यासाठी मोबाईलचा अतिवापर टाळा, मोबाईलशिवाय आयुष्य सुंदर आहे, असे विचार युवा प्रवचनकार श्री जयभानुशेखर विजयजी यांनी व्यक्त केले.
सांगली येथील श्री अमिझरा पार्श्वनाथ जैन देहरासर संघात दक्षिण महाराष्ट्रातील जैन समाजातील युवकांचे संमेलन झाले. यावेळी तार्किक शिरोमणी श्रमणी गणनायक प. पू. आचार्यदेव श्री अभयशेखर सुरीश्वरजी महाराजसाहेब यांचे शिष्य जयभानुशेखर विजयजी यांनी या संमेलनाला संबोधित केले. युवा संगीतकार अक्षत संघवी यांनी भक्तिसंगीत सादर केले.
ते म्हणाले, तरुण मुलांच्या हातातील मोबाईलच्या अतिवापरामुळे स्मरणशक्ती, राग, डोळ्यांचे आजार, वेळेचा अपव्यय, निद्रानाश अशा अनेक चिंताजनक समस्या समोर येत आहेत. तरुणपिढीने मोबाईलचा वापर मर्यादित करावा. युवकांनी जैन शासन सेवा कुंभोजगिरी तीर्थसेवा, साधू-साध्वी विहार सेवा आणि संघाच्या विविध उपक्रमांत सहभाग घेऊन पुण्यक्रमाचा स्त्रोत तयार करावा.
जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष शहा, उपाध्यक्ष जतीन शहा, सचिव जितेंद्र जैन, संचालक विपूल मेहता, राेहन मेहता यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करून युवकांचे स्वागत करण्यात आले. इस्लामपूर जैन संघाचे ट्रस्टी भूषण शहा यांनी सांगली जैन संघाचे आणि युवा संमेलन संघाच्या आयोजकांचे अभिनंदन केले. इस्लामपूरचे उद्योजक गौतम रायगांधी, नीलेश शहा, नमन शहा यांनी मनोगत व्यक्त केले.
महावीर भन्साळी यांनी आभार मानले. यावेळी संदेश शहा, किशोर रायगांधी, राकेश कोठारी, अभय शहा, जितेंद्र शहा, तेजस शहा, राहुल पारेख, सनी कोठारी, रितेश शहा, नितीन पारेख, श्रेयश शहा, देवेंद्र शहा, किर्ती शहा, अमर मेहता, वैभव शहा उपस्थित होते.