सांगली : खासगी प्रयोगशाळांत कोविड चाचण्यांसाठी रुग्णांची लूट केली जात असल्याची तक्रार रुग्ण सहाय्यता समितीने केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत तक्रारी आल्यानंतर शासनाने चाचण्यांसाठी दर ठरवून दिले, मात्र त्यानुसार शुल्क न आकारता वाढीव दर लावले जात आहेत. रॅपिड अँटिजन चाचण्यांचे शासकीय शुल्क १५० रुपये आहे, मात्र रुग्णांकडून ५०० ते ६०० रुपये वसूल केले जात आहेत. आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये शुल्क असताना हजार ते दीड हजार रुपयांची आकारणी सुरु आहे. चाचणीचे बिलही दिले जात नाही.
ही लूट थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवावी. सर्व पॅथॉलॉजी लॅबची तपासणी करावी. लुटमार करणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत.
चौकट
घरच्या घरी चाचणी धोकादायक
दरम्यान, कोरोनाची चाचणी घरच्या घरी करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. एका छोट्या किटद्वारे तपासणी शक्य आहे. घरच्या घरी तपासण्यांमुळे धोकादायक स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे औषध दुकानांतून किट नेणाऱ्यांच्या काटेकोर नोंदी प्रशासनाने ठेवाव्यात. किट वापरानंतर शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाईल याकडेही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. घरच्या घरी चाचणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह आल्यास ते प्रशासनाला कसे कळणार हेदेखील स्पष्ट करण्याची मागणी समितीने केली आहे.