बांधकाम सभापतींची पाण्याची लिकेज काढण्यासाठी खुदाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:24 IST2021-04-05T04:24:06+5:302021-04-05T04:24:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी हे प्रादेशिक ...

बांधकाम सभापतींची पाण्याची लिकेज काढण्यासाठी खुदाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी हे प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या पिण्याच्या पाईपलाईन लिकेज काढण्यासाठी चक्क स्वत: खुदाई करण्यासाठी उतरले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ गावासाठी पिण्याच्या पाईपलाईनद्वारे केदारवाडी येथून कृष्णा नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. रविवारी सकाळी या पाईपलाईनला गळती लागली होती. ती नेर्ले गावाजवळ होती. यामुळे गावात पाणीपुरवठा बंद होता. यावेळी गावचे उपसरपंच चंद्रकांत पवार, माजी उपसरपंच शंकर पाटील, तसेच सयाजी कदम, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग गळती काढण्यासाठी निघाले होते. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी हेसुद्धा या ठिकाणी त्याच्यासोबत आले. त्यांनी ठिकाणे पाहून सर्व कर्मचारी वर्ग लिकेज काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. ती पाईपलाईन मोठी गळती असल्याने लवकर दुरुस्त होणार नाही आणि ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत होणार नाही यासाठी स्वत. जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी हे हातात टिकाव घेऊन कामाला लागले. यामुळे त्यांच्यासोबत शंकर पाटील, चंद्रकांत पवार, सयाजी कदम, मयूर कांबळे, राजू माळी तसेच कर्मचारी यांनी गळती काढून पाणीपुरवठा सुरू केला.