माजी संचालकांवरील टांगती तलवार कायम

By Admin | Updated: April 21, 2015 00:32 IST2015-04-21T00:25:03+5:302015-04-21T00:32:22+5:30

जिल्हा बँक निवडणूक : पात्र-अपात्रतेचा फैसला लांबणीवर

Ex-directors maintain hangover | माजी संचालकांवरील टांगती तलवार कायम

माजी संचालकांवरील टांगती तलवार कायम

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २३ माजी संचालकांच्या पात्र-अपात्रतेबाबतचा फैसला दोन दिवस लांबणीवर गेला आहे. तिन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, असे सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार अजूनही माजी संचालकांच्या मानगुटीवर लटकत आहे. येत्या २४ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने, या मुदतीपूर्वी निकाल अपेक्षित आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यातील २३ दिग्गज नेत्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. चौकशी शुल्काच्या वसुलीचे आदेश काही दिवसांपूर्वी सहकार विभागाने दिले होते. याच कारवाईच्या आधारे माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. या कारवाईविरोधात १३ एप्रिल रोजी माजी संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. संचालकांच्यावतीने अ‍ॅड. लुईस शहा, अ‍ॅड. पितांबरे यांनी युक्तिवाद केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने अ‍ॅड. पंडित सावंत यांनी माजू मांडली. जवळपास तासभर युक्तिवाद झाला. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, प्रा. शिकंदर जमादार, बी. के. पाटील, माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे उपस्थित होते.
ज्या आक्षेपार्ह रकमेची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही, त्याची जबाबदारी निश्चित झालेली नाही. त्यापूर्वीच आॅडिट फीची वसुली संबंधित संचालकांकडून कशी होऊ शकते?, असा सवाल माजी संचालकांनी उपस्थित केला आहे. उच्च न्यायालयानेही याच मुद्याच्या आधारे निर्णयास स्थगिती दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी ज्या कारणास्तव माजी संचालकांचे अर्ज अवैध केले आहेत, ते वैध केले जावेत, अशी मागणीही केली.
दराडे यांनी तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर याबाबत निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे आणखी दोन दिवस माजी संचालकांच्या मानगुटीवर अपात्रतेची टांगती तलवार लटकणार आहे. आज निर्णय होईल, अशी अपेक्षा माजी संचालकांना होती. मात्र आता त्यांना पुन्हा दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)


उच्च न्यायालयाने माजी संचालकांना न्याय दिला आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या कोर्टातही आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. आम्हाला सहकार विभागाबद्दल आदर आहे. त्यामुळे आम्ही अजूनही आशावादी आहोत.
- प्रा. शिकंदर जमादार, माजी संचालक


बैठक बारगळली
आ. जयंत पाटील यांनी जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय एकत्रिकरणाचे प्रयत्न चालू केले असले तरी, शनिवारी होणारी बैठक बारगळली. सोमवारी याबाबत सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा होईल, असे सांगण्यात आले होते. सोमवारीही कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.

Web Title: Ex-directors maintain hangover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.