सगळे संपावेत, हीच जयंतरावांची भावना

By Admin | Updated: May 3, 2015 00:57 IST2015-05-03T00:55:55+5:302015-05-03T00:57:20+5:30

पतंगराव कदम : महत्त्वाकांक्षेपोटी राजकारण

Everyone collapsed, this is the spirit of Jayantrao | सगळे संपावेत, हीच जयंतरावांची भावना

सगळे संपावेत, हीच जयंतरावांची भावना

सांगली : जयंतराव जबरदस्त महत्त्वाकांक्षी माणूस आहे. जिल्ह्यातले सगळे मेले पाहिजेत, आपण तेवढे राहिले पाहिजे, अशी भावना ठेवून सर्वांना खेळवत ठेवायचा प्रकार ते करतात, अशी टीका काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.
जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारात दोन दिवसांपूर्वी डॉ. कदम यांच्यावर माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी टीका केली होती. त्याबाबत पतंगराव म्हणाले की, मला कुणी ‘टार्गेट’ केले तरी मी अशा गोष्टींना जुमानत नाही. वादळे अनेक झेलली आहेत. पचवलीसुद्धा आहेत. त्यामुळे माझ्याविषयी कोणी काहीही टीका केली तरी त्याला मी कधी उत्तर देत नाही. जयंतराव हे एक जबरदस्त महत्त्वाकांक्षा असणारे नेते आहेत. सर्वांनी आपल्या मर्जीप्रमाणे खेळत रहावे, असे त्यांना वाटत असते. त्यांच्या मर्जीनुसार सर्वकाळ सर्वजण खेळत राहतील, असे होणार नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला मी कधी गेलो नाही, कोणावर टीकाही केली नाही, तरीही कोणी मला टार्गेट करीत असेल, तर मला काही त्याच्याशी देणे-घेणे नाही.
जिल्ह्यातील सहकाराच्या अधोगतीस संस्थेमधील कारभारीच कारणीभूत आहेत. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या आदेशामुळे शासनाला अशा सहकारी संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करणे भाग पडले. त्यावेळी मी सहकारमंत्रीही नव्हतो. त्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता मतदारच काय करायचे ते ठरवतील. कोणाला निवडून द्यायचे, कोणाच्या हाती कारभार द्यायचा, हे त्यांचे त्यांनी ठरवावे.
दुष्काळी प्रश्नावर ते म्हणाले की, लोकांच्या जिवाशी कोणी खेळ करू नये. दुष्काळाच्या विषयात राजकारण करणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांच्यासारखा देशपातळीवरील नेता दुष्काळी भागात फिरत असताना त्याला स्टंटबाजी म्हटले जात आहे. वास्तविक दुष्काळी भागातील लोकांच्या भावना समजून घेतल्यानंतर त्या संसदेत योग्य पद्धतीने मांडता येतात. त्यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधीने असे दौरे केले म्हणजे तो स्टंट नसतो. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नावरील असे राजकारण थांबवावे. आघाडी सरकारने आपत्ती व्यवस्थापनाचे चांगले काम केले होते. साडेबारा हजार कोटी रुपये मदत व पुनर्वसन खात्याने दिले. धडाडीने निर्णय आम्ही घेतले होते.
संजय पाटलांच्या मी स्वप्नात आलो का?
खासदार संजय पाटील यांच्याबद्दल एक अक्षरही मी बोललो नाही, तरीही मी दमबाजी केल्याचे ते सांगत आहेत. त्यांना मी स्वप्नात दिसलो का? की त्यांना माझा भास होतोय, असा सवाल पतंगरावांनी केला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Everyone collapsed, this is the spirit of Jayantrao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.