मिरज : मिरजेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी मिरज रेल्वे स्थानकात महापालिकेने चाचणी केंद्र सुरु केले आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी जंक्शनमधील कोरोना तपासणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची व नागरिकाची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यापासून महापालिका क्षेत्रात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण वाढू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी, प्रवासासाठी किंवा बाजारासाठी गर्दी होणाऱ्या शहरातील गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने कोविड चाचण्या सुरू केल्या आहेत. सध्या महापालिकेने पूर्वीपेक्षा चार पटीने अधिक चाचण्या सुरू केल्याने गेल्या चार दिवसात महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याचे दिसून येत असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची संख्या महापालिका क्षेत्रात स्थिर आहे. संख्या वाढू नये यासाठी नागरिकांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी कोरोना गेला या भ्रमात राहू नये. महापालिका क्षेत्रातून कोरोना हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील वैद्यकीय अधिकारी डाॅ. रवींद्र ताटे, डाॅ. अक्षय पाटील यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.