सांगलीच्या सुपुत्राकडून एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST2021-05-24T04:24:40+5:302021-05-24T04:24:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीचे सुपुत्र व नवी मुंबईत नियुक्तीस असणारे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट ...

Everest peak climbed by Sangli's son | सांगलीच्या सुपुत्राकडून एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत

सांगलीच्या सुपुत्राकडून एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीचे सुपुत्र व नवी मुंबईत नियुक्तीस असणारे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालण्यात यश मिळवले. रविवारी सकाळी अंतिम चढाई पूर्ण करत ८ हजार ८४८ मीटर उंचीवर तिरंगा फडकावला.

पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले आहेत. शिवाय सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पहिले एव्हरेस्टवीर असा पराक्रम त्यांच्या नावे नोंदला गेला आहे.

पडवळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील संभाजी गुरव सुमारे पंधरा वर्षांपासून पोलीस दलात आहेत. एव्हरेस्ट चढाईसाठी दोन वर्षांपासून त्यांची तयारी सुरू होती. गेल्या ६ एप्रिल रोजी मुंबईतून रवाना झाले. नेपाळमधील पायोनियर ॲडव्हेंचर्स या गिर्यारोहक कंपनीमार्फत सहा जणांच्या पथकातून चढाई सुरू केली. काही दिवसांपूर्वी किलीमांजरी शिखर सर केल्याने आत्मविश्वास वाढला होता. १८ मेपासून नेपाळच्या बाजूने प्रत्यक्ष एव्हरेस्टवर चढाई सुरू केली.

२१ मेरोजी अंतिम चढाईसाठी चांगले वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. बेस कॅम्पला कोरड्या वातावरणात जास्त दिवस राहिल्याने पथक अंतिम चढाईसाठी लूकला या ठिकाणी हिरव्यागार वातावरणात काही दिवस थांबले. यादरम्यान, त्यांचा शेर्पा आजारी पडल्यानेही मोहिमेत अडथळा आला. एव्हरेस्ट शिखराच्या खूप जवळ गेल्याची भावना होती; पण कॅम्प क्रमांक तीनपासून पुढे शारीरिक आणि मानसिक कसोटी होती. तेथून पुढे धोकादायक ‘डेथ झोन’ही होता. बर्फवृष्टी, व्हाइटआऊट (बर्फाचे धुके) याचाही त्रास झाल्याचे गुरव यांनी सांगितले. शेवटच्या टप्प्यात हिमभेगाही दिसत नव्हत्या; पण अनुभवी शेर्पामुळे चढाई शक्य झाली.

चौकट

पहिलेच मराठी पोलीस अधिकारी

सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा व औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी रफिक शेख यांनी यापूर्वी एव्हरेस्ट सर केले आहे; पण शर्मा पंजाबी अधिकारी, तर शेख पोलीस कर्मचारी होते. गुरव हे पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले आहेत.

चौकट

गडचिरोलीमध्येही पराक्रम

गुरव यांनी गडचिरोलीमध्ये असताना केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल २०१४ मध्ये राष्ट्रपती पदक, २०१५ मध्ये विशेष सेवा पदक, २०१८ मध्ये आंतरिक सेवा पदक व महासंचालकांचे विशेष पदक मिळवले आहे. धाडसी पोलीस अधिकारी अशी त्यांची पोलीस दलातील प्रतिमा आहे.

चौकट

अशी केली चढाई

१८ मे - बेस कॅम्प ते कॅम्प २

१९ मे - कॅम्प २ ते कॅम्प ३

२० मे - कॅम्प ३ ते कॅम्प ४

२१ मे - कॅम्प ४ ते एव्हरेस्ट समिट

२३ मे सकाळी - शिखरावर तिरंगा

चौकट

पडवळवाडीमध्ये आनंदोत्सव

संभाजी गुरव यांचे मूळ गाव असलेल्या पडवळवाडीमध्ये सकाळीच गुरव यांच्या पराक्रमाची माहिती समजली. त्यानंतर आनंदोत्सव साजरा झाला. वडील नारायण यांनी मुलाच्या कर्तृत्वाचा खूपच आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. संंभाजी यांच्या पत्नी सुजाता म्हणाल्या, ‘गेली दोन वर्षे एव्हरेस्ट चढाईसाठी प्रयत्न सुरू होते, या मेहनतीचे चीज झाले.’

Web Title: Everest peak climbed by Sangli's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.