अखेर तो कोरोनाबाधित अध्यक्ष निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:54+5:302021-03-31T04:26:54+5:30
सांगली : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीत कोरोनाबाधित असतानाही अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्या आरोग्य कर्मचाऱ्यावर अखेर मंगळवारी ...

अखेर तो कोरोनाबाधित अध्यक्ष निलंबित
सांगली : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीत कोरोनाबाधित असतानाही अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्या आरोग्य कर्मचाऱ्यावर अखेर मंगळवारी निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.
सांगलीतील जिल्हा परिषद कर्मचारी को-ऑप. सोसायटीची २५ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. या वेळी अध्यक्षपदी निवड झालेला आरोग्य विभागाकडील कर्मचारी हा कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत प्रसिद्धी माध्यमात माहिती प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी याबाबतचा अहवाल नुकताच दिला. या अहवालानुसार संबंधित कर्मचारी दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने त्या कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारीच इतके बेफिकीर असल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.
चौकट
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कारवाई आवश्यक
आरोग्य विभागाच्या २१ मार्चच्या कोरोना रिपोर्टच्या यादीत त्या व्यक्तीचे नाव पॉझिटिव्ह यादीत आहे. पाझिटिव्ह रुग्णाने किमान १४ दिवस होम आयसोलेशनमध्ये असावे, हातावर शिक्का मारावा, संबंधितांच्या घरावर बोर्ड लावावा असे आदेश आहेत. मात्र यापैकी कोणत्याची आदेशाचे पालन संबंधित कर्मचाऱ्याने केल्याचे दिसत नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कारवाई करणे आवश्यक आहे.