राजू शेट्टी रिंगणात येऊनही ‘स्वाभिमानी’ अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST2021-03-13T04:47:33+5:302021-03-13T04:47:33+5:30

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी स्वत: माजी खासदार राजू शेट्टी उसाच्या एकरकमी ...

Even though Raju Shetty is in the arena, 'Swabhimani' is upset | राजू शेट्टी रिंगणात येऊनही ‘स्वाभिमानी’ अस्वस्थ

राजू शेट्टी रिंगणात येऊनही ‘स्वाभिमानी’ अस्वस्थ

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी स्वत: माजी खासदार राजू शेट्टी उसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा घेऊन रिंगणात उतरले आहेत. त्याची सुरुवात राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलनाने झाली आहे. मात्र कमी प्रतिसादामुळे संघटना अस्वस्थ आहे. कारण शेतकऱ्यांना दरापेक्षा ऊस घालवण्याची चिंता जास्त आहे.

शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळवून देण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगदान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक समाधानी आहे. मात्र सांगली जिह्यातील बहुतांशी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली नाही. हाच मुद्दा घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. एकीकडे या संघटनेचे विरोधक, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांनी भाजपशी सलगी केली आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपासून राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या जवळ गेले आहेत. या दोघांच्या भूमिकेने शेतकऱ्यांत उलट-सुलट चर्चा आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. यापूर्वी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन या कारखान्याने मोडित काढले आहे. वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी आहे. कोणत्याही आंदोलनावेळी राष्ट्रवादीला ऊस उत्पादकांची साथ मिळते. यंदा शेतातील ऊस गळितासाठी वेळेत जाणे, हे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे एफआरपीबाबत संघटनेच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद दिसतो. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटना अस्वस्थ आहे. संघटनेची ताकद वाढविण्यासाठी शेट्टी रिंगणात उतरले आहेत.

कोट

राजारामबापू कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे एफआरपी देण्याबाबत विलंब होत आहे. सध्या ऊसतोड होणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना सरासरी २५०० रुपये दर मिळतो. त्यामुळे आमच्या कारखान्याचे सभासद समाधानी आहेत.

आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू कारखाना

कोट

राजारामबापू कारखान्यावर आंदोलनाचे नियोजन होते. त्यापूर्वीच प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या आंदोलनात स्वत: राजू शेट्टी उतरले. पोलिसांच्या धरपकडीमुळे ऊसउत्पादक आंदोलनाकडे आले नाहीत.

- भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Web Title: Even though Raju Shetty is in the arena, 'Swabhimani' is upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.