शासन निर्णयाआधीच इस्लामपुरात प्रभाग रचनेवर चर्चेचा धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:32+5:302021-09-17T04:31:32+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेबाबत शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. ...

शासन निर्णयाआधीच इस्लामपुरात प्रभाग रचनेवर चर्चेचा धुरळा
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेबाबत शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्याआधीच इच्छुक सोयीनुसार उलट-सुलट चर्चा करीत आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धत किंवा एकसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे निवडणूक घ्यावी, यावर अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधी गटामधील नेत्यांनी सोयीप्रमाणे प्रभाग रचनेबाबत स्वप्ने रंगवण्यास सुरुवात केली आहे. पालिका निवडणुकीत एकसदस्यीय पद्धतीने मतदान होणार म्हणून इच्छुकांनी गुडग्याला बाशिंग बांधले आहे; तर दुसरीकडे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची हवा पसरली आहे. त्यामुळे उतावळे इच्छुक पुन्हा चिंतेत पडले आहेत.
दोन उमेदवारांचा प्रभाग राहिल्यास रचनेत बदल होणार किंवा नाही याचा अभ्यास नसल्याने काही नेते खोट्या बातम्या पसरवत आहेत; परंतु शासनाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. सध्या तीन मागासवर्गीय प्रभाग आहेत. याबाबत शासनाने काही बदल सुचवले आहेत. चक्रावर्ती (रोटेशन) पद्धतीने प्रभाग बदलल्यास कोणताही प्रभाग राखीव होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली आहे. त्यामुळे वाढलेली लोकसंख्या प्रत्येक प्रभागात विभागली जाणार आहे. परिणामी काही नेते बदल होण्याच्या आशेवर आहेत.
चौकट.
निवडणुकीची तयारी
इस्लामपुरात राष्ट्रवादीने पालिका निवडणुकीची तयारी केली आहे. शहरात नेतृत्वाचा अभाव आहे. गत निवडणुकीप्रमाणे काही निर्णय झाल्यास पुन्हा राष्ट्रवादीला फटका बसू शकतो; तर सत्ताधरी विकास आघाडीत आजही ताळमेळ नाही. त्यामुळे त्यांची तयारी दिसून येत नाही.