सांगली : कोरोना काळात सर्वांचीच नाकेबंदी झालेली असताना आरोग्य विभागाला मात्र ऊसंत नव्हती. यंत्रणेचा मोठा भाग कोरोनाविरोधात लढा देत असताना दुसरा भाग मात्र सामान्य आरोग्य सेवेची जबाबदारी सांभाळत होता. बालकांचे लसीकरण ही त्यापैकीच एक मोठी जबाबदारी होती. ती यशस्वी करण्यात यंत्रणा यशस्वी ठरली. ४० हजारांहून अधिक बालकांचे योग्य वेळेत लसीकरण करण्यात आले.
मुलाच्या जन्मापासून पाच वर्षांपर्यंतच्या टप्प्यात वेगवेगळ्या लसी देण्यात येतात, त्यामध्ये पोलिओ लसीचाही समावेश आहे. लॉकडाऊन काळात बालकांशी संपर्क धोक्याचा असला तरी शासकीय रुग्णालयांत काळजी घेऊन लसी देण्यात आल्या. नुकत्याच जन्मलेल्या बालकांचे रुग्णालयातच लसीकरण झाले. चोवीस तासांच्या आतील सर्व लसी टोचण्यात आल्या. यादरम्यान, मिरजेचे शासकीय रुग्णालय कोविड स्पेशल म्हणून जाहीर झाल्याने तेथील प्रसूती विभाग सर्वसामान्य गर्भवतींसाठी बंद ठेवण्यात आला होता. सांगलीत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात सोय केली होती. मिरजेत फक्त कोरोना बाधित गर्भवतींची प्रसूती केली जात होती. त्यामुळे सांगली रुग्णालयात जन्मलेल्या अर्भकांचे लसीकरण तत्काळ शक्य झाले.
त्यानंतरचे लसीकरण दीड महिने व पुढे २८ दिवसांच्या टप्प्यांनी होते. त्यांच्यासाठी आरोग्य विभागाने खास शिबिरे घेतली. धनुर्वात, डांग्या खोकला, कावीळ, पोलिओ, गोवर, कांजिण्या, मेंदूज्वर, बीसीजी इत्यादी सर्व लसी यशस्वीरित्या बालकांना मिळाल्या. आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविकांनीही लसीकरणावर लक्ष ठेवले. जिल्हा आरोग्य यंत्रणेने प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांपर्यंत कोरोना काळातही लसी पोहोचविल्या, त्याचा फायदा अर्भकांना मिळाला.
चौकट
२०१९ मध्ये १०० टक्के लसीकरण
२०१९ मध्ये जिल्हाभरात शंभर टक्के लसीकरण करण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरली. डिसेंबर २०१९ मध्ये जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू झालेला असताना भारतात मात्र अद्याप प्रादुर्भाव नव्हता, त्यामुळे डिसेंबरपर्यंत जन्मलेल्या सर्व बालकांना त्याच वर्षी लस मिळाली. त्यानंतरही अगदी मार्चपर्यंत लसीकरण सुरळीत सुरू राहिले. लॉकडाऊन सुरू झाल्यावर मात्र अडथळे येत गेले.
पॉईंटर्स
४०६८९ - कोरोना काळातही बालकांचे झाले लसीकरण.
चौकट
- जन्मानंतर २४ तासांच्या आत - बीसीजी
- दीड महिन्यानंतर - डांग्या खोकला
- त्यानंतर २८ दिवसांनी - कावीळ
- त्यानंतर पुन्हा २८ दिवसांनी - ओरल पोलिओ
- नऊ महिन्यांनंतर - गोवर
- १६ महिन्यानंतर २४ महिन्यांपर्यंत - पोलिओ
चौकट
कोरोना काळात लसीकरणाचे महत्व पटल्याने बालकांच्या लसीकरणासाठी माता आग्रही राहिल्याचे दिसून आले. अंगणवाडी सेविकांनीही त्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
चौकट
गेल्या वर्षभरात ४० हजार ६८९ बालकांचे लसीकरण झाले. त्याद्वारे ८१ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. उर्वरित लसीकरण अजूनही सुरू आहे.
कोट
कोरोना काळात व नंतरही बालकांच्या लसीकरणासाठी आवश्यक कार्यवाही केली. लसीकरणापासून बालके वंचित राहू नयेत यासाठी विशेष शिबिरे घेतली. आरोग्य कर्मचारी प्रसंगी घरोघरी पोहोचले.
- डॉ. विवेक पाटील, माता बालसंगोपन अधिकारी.