अशोक डोंबाळेसांगली : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आमदार जयंत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेचे दोन संचालकही भाजपमध्ये गेल्यामुळे बँकेत सत्ताबदल होईल की काय? अशा चर्चांनी जोर धरला आहे. पण, बँकेच्या एकूण २१ संचालकांपैकी सर्वाधिक आठ संचालक जयंत पाटील यांच्याकडे कायम असल्यामुळे त्यांची बँकेतील सत्ता अबाधित आहे. दोन तज्ज्ञ संचालकही महाविकास आघाडीकडेच आहेत.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपचे शेतकरी विकास पॅनल आणि महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनल होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - ९, काँग्रेस - ५, भाजप - ४, शिवसेना - ३ असे चित्र होते. पण, त्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातून जिल्हा बँकेत आलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. भाजपकडून विजयी झालेले प्रकाश जमदाडे यांचेही भाजप नेत्यांशी जमत नसल्यामुळे ते तटस्थ आहेत. जिल्हा बँकेच्या राजकारणात गेल्या चार वर्षांत बेरीज-वजाबाकीनेच मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत. यामुळे काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिमण डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तरीही जिल्हा बँकेत जयंत पाटील यांच्या सत्तेला कोणताही धोका नाही, असेच संख्याबळावरून स्पष्ट दिसत आहे. सध्या जयंत पाटील गटाकडे आठ संचालक आणि काँग्रेसचे चार संचालक, दोन तज्ज्ञ संचालक असे एकूण २३ पैकी १४ संचालक महाविकास आघाडीकडे आजही आहेत. भाजपचे पाच, मित्रपक्ष शिवसेनेचे दोन असे महायुतीकडे सात संचालक आहेत. अजितराव घोरपडे आणि प्रकाश जमदाडे सध्या तटस्थ आहेत. या संख्याबळावरून जयंत पाटील यांची जिल्हा बँकेतील सत्ता अबाधित असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जयश्री पाटील, चिमण डांगेंचा भाजप प्रवेशइस्लामपूरचे माजी नगरसेवक चिमण डांगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून जिल्हा बँकेचे संचालक झाले आहेत. पण, दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांनाही काँग्रेसकडून जिल्हा बँकेत संधी मिळाली होती. पण, सध्या पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्हा बँकेत भाजपच्या संचालकांची संख्या तीनवरून पाच झाली आहे. तरीही बहुमत हे जयंत पाटील गटाकडेच आहे.
जिल्हा बँकेतील पक्षीय बलाबलराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, संचालक दिलीप पाटील, सुरेश पाटील, वैभव शिंदे, बाळासाहेब होनमोरे, अनिता सगरे, मनोज शिंदे, मन्सूर खतीब, बाळासो पाटील.भाजप : बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, संचालक सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख, चिमण डांगे, राहुल महाडिक.काँग्रेस : खासदार विशाल पाटील, माजी आमदार माेहनराव कदम, महेंद्र लाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, रामचंद्र सरगर.शिवसेना : तानाजी पाटील, अमोल बाबर.तटस्थ : माजी मंत्री अजितराव घोरपडे, प्रकाश जमदाडे.