शाळा सुरू तरीही जिल्ह्यात एसटीच्या २३०० फेऱ्या रद्दच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:29+5:302021-02-05T07:31:29+5:30
राज्य शासनाने नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवी असे वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची वर्गातील ...

शाळा सुरू तरीही जिल्ह्यात एसटीच्या २३०० फेऱ्या रद्दच
राज्य शासनाने नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवी असे वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती जवळपास ७२ टक्केपर्यंत आहे. शहरातच ५२ टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा एकमेव आधार आहे; पण सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतरही जिल्ह्यातील बसच्या दोन हजार ३०० फेऱ्या बंदच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
चौकट
तीन गावांकडे एसटी फिरकलीच नाही
आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी, माळेवाडी, हितवड या गावांमध्ये कोरोनापूर्वी एसटी येत होती. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना आटपाडी, करगणी येथे शाळा, कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाण्याची सोय होती; परंतु सध्या येथे येणारी एसटी बंद झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी बस सुरू करण्याची एसटी प्रशासनाकडे मागणी केली आहे.
चौकट
शाळा सुरू संख्या : १४८३
चौकट
पहिली ते आठवी : १२१५२०
नववी ते बारावी : १५५४२१
कोट
कोरोनापूर्वी ५ हजार ५०० बसच्या फेऱ्या होत होत्या. त्यापैकी सध्या ३ हजार २०० फेऱ्या सुरू झाल्या आहेत. २ हजार ३०० फेऱ्या होत नाहीत. मुंबईला गेलेल्या ५० बस आल्यानंतर सर्व मार्गावर बस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी मार्गावरील बसची वाहतूक सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आहे.
-आलम देसाई, प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी.
कोट
मी कॉलेजला तासगावला जातो. पूर्वी कॉलेजच्या वेळेत तीन ते चार बस होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत नव्हती; पण सध्या एक बस असूनही तीही कॉलेजच्या वेळेत नसल्यामुळे दोन तास लवकर जावे लागते. माझ्याप्रमाणे अन्य विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे.
-प्रमोद पाटील, विद्यार्थी.
चौकट
कोरोनात ४४ बसच्या झाल्या मालगाड्या
कोरोनापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये एसटीकडे ९०४ बस होत्या. त्यापैकी कोरोनात बस वाहतूक थांबल्यामुळे ४४ बसच्या माल वाहतूक गाड्या तयार केल्या आहेत. तसेच १०० कालबाह्य बस स्क्रॅप केल्या आहेत. सध्या मुंबईची लोकल बंद असल्यामुळे ५० बस आणि शंभर चालक, शंभर वाहक आजही मुंबईकरांच्या सेवेसाठी आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यातील दहा आगारांकडे केवळ ७१० बस कार्यरत आहेत. बसची संख्या कमी असल्यामुळे दोन हजार ३०० फेऱ्या एसटी प्रशासनास रद्द कराव्या लागत आहेत.