इथिओपियाचा जिफार ‘हिल मॅरेथॉनचा गोविंदा’
By Admin | Updated: September 6, 2015 22:16 IST2015-09-06T22:16:41+5:302015-09-06T22:16:41+5:30
वेगे वेगे धावू... डोंगरावर जाऊ : निसर्गाच्या संगतीनं धावले हजारो धावपटू; यंदाही पुरुष-महिला गटात परदेशी स्पर्धकांनी मारली बाजी

इथिओपियाचा जिफार ‘हिल मॅरेथॉनचा गोविंदा’
सातारा/पेट्री : एका बाजूला दहिहंडीची जोरदार तयारी सुरु तर दुसरीकडे भल्या सकाळी सातारच्या रस्त्यावरून धावणारे जगभरातील धावपटू असा अनोखा मेळ रविवारी जुळून आला. सातारा शहरात आयोजित केलेल्या चौथ्या हिल मॅरेथॉन स्पर्धेत यंदा तब्बल पाच हजारहून अधिक स्पर्धक दौडले. यवतेश्वरच्या डोंगरातून नागमोडी घाटातून हिरव्या निसर्गाच्या संगतीने हजारो स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. वेगे वेगे धावून डोंगरावरील इच्छित स्थळी पोहोचून यंदाही परदेशी धावपटूंनी प्रथम तीन क्रमांकावर आपले नाव कोरले अन् इथिओपियाचा धावपटू बिरुक जिफारने सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेची हंडी फोडत सर्वोत्कष्ट गोविंदा ठरला.पोलीस परेड ग्राऊंड ते प्रकृती हेल्थ रिसॉर्ट व पुन्हा पोलीस परेड ग्राऊंड अशी २१ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा सकाळी सहा वाजता सुरू झाली. खा. उदयनराजे भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला. ही स्पर्धा तीन विभागांमध्ये घेण्यात आली. तिन्ही स्पर्धेसाठी सुमारे पाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी सर्व विभागांनी जय्यत तयारी केली होती. स्पर्धकांना कोणताही अडसर होऊ, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी रुग्णवाहिकाही सज्ज होत्या. स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी पाणी, फळांचा रस तसेच प्रथमोपचाराची सोय करण्यात आली होती.स्पर्धेदरम्यान प्लास्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्या तसेच इतर कचरा नागरिक, कर्मचाऱ्यांनी गोळा करून परिसर स्वच्छ केला. (प्रतिनिधी)
टाळ्या वाजवून प्रोत्साहन
पोलीस परेड ग्राऊंड येथून सकाळी सहा वाजता हिल मॅरेथॉनला प्रारंभ झाला. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा, तसेच इमारतीच्या छतावर, गॅलरीत उभे राहून साताराकरांनी गर्दी केली होती. बकअप, गो फास्ट, एक्सलंट, कमॉन असे ओरडून स्पर्धकांचा उत्साह वाढविला जात होता तसेच टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले जात होते.
सोशलमीडिया जपून वापरण्याचा संदेश
काही स्पर्धक फलक घेऊन सोशलमीडिया वापराबाबत संदेश देत होते. ‘वापरताना ठेवा भान, व्हॉटस्अॅप ठरेल वरदान’, चालविताना मोबाईलवर बोलू नये, ‘मोबाईल कानाला, जीव टांगणीला,’ ‘फोर व्हीलरला सीटबेल्ट, तर मग का नाही टू व्हीलरला हेल्मेट,’ असा संदेश दिला जात होता.
९६ वर्षांचा तरुण स्पर्धक
या स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे या मॅरेथॉनमध्ये अबालवृद्धांचा सहभाग असतो. यंदा अबापुरी-वर्णे, ता. सातारा येथील ९६ वर्षीय शंकरराव पवार यांनी २१ किलोमीटरची ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. एखाद्या तरुणालाही लाजवेल, असा उत्साह या आजोबांमध्ये दिसून येत होता. ठिकठिकाणी सातारकर टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत होते. मात्र माजी सैनिक असणाऱ्या पवार यांना खेळाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरही ते विविध खेळांमध्ये हिरीरीने सहभागी होतात तर एका अंध आजोबांनी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
यशाचे मानकरी...
सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत यंदाही परदेशी धावपटूंनी बाजी मारत प्रथम तीन क्रमांक पटकावले. विशेष म्हणजे तिन्ही स्पर्धक हे इथोपियाचे आहेत. यातील बिरुक जिफारने १ तास ७ मिनिटे आणि ४७ सेकंदात २१ किलोमीटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांकाच्या दीड लाख रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला. टॅमरॅट गुडेटा
, गुडिसा डिबेले यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे पटकावली. भारतीय स्पर्धकांमध्ये दीपक कुंभार याने १ तास १२ मिनिटे आणि १ सेकंदात तर महिला गटात नीलम रजपूतने १ तास १४ मिनिटे १५ सेकंदात हे अंतर पार केले.
स्पर्धकांसंगे आमदारही दौडले...
सातारा हिल मॅरेथॉनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सहभाग घेऊन २१ किलोमीटरची दौड पूर्ण केली. या स्पर्धेत वेदांतिकाराजे भोसले, नगराध्यक्ष सचिन सारस, उपविभागीय परिवहन अधिकारी संजय राऊत, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी सहभाग घेतला.
स्पर्धकांच्या संख्येत वाढ
गेल्या वर्षी सातारा हिल मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील सुमारे २१०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या स्पर्धेत तब्बल २७१३ स्पर्धकांनी घाटातील स्पर्धेचा थरार अनुभवला.