इंग्रूळच्या युवकाकडून सौरऊर्जा निर्जलीकरण प्रकल्प उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:41+5:302021-06-01T04:19:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता इंग्रूळ (ता. शिराळा) येथील प्रणव किशोर ...

इंग्रूळच्या युवकाकडून सौरऊर्जा निर्जलीकरण प्रकल्प उभारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता इंग्रूळ (ता. शिराळा) येथील प्रणव किशोर हसबनीस या युवकाने सौरऊर्जा निर्जलीकरण प्रकल्पाची उभारणी केली आहे.
प्रणवचे शिक्षण बी. कॉम., एमबीएपर्यंत झालेले. नोकरीच्या मागे न लागता सौरऊर्जा निर्जलीकरण प्रकल्प त्याने उभारला आहे. निर्जलीकरणाची यंत्रणा सौरऊर्जेवर असल्यामुळे विजेची बचत होते. या यंत्रणेद्वारे ताजा शेतीमाल, फळे, भाज्या, खाद्यपदार्थांचे निर्जलीकरण करता येते. हे संयंत्र पदार्थामधील आर्द्रता काढते. तापमान कमाल ७० अंशापर्यंत जाते. पदार्थ सुकविण्यासाठी ५५ अंश तापमान योग्य आहे. सौरऊर्जेवर निर्जलीकरण केल्यामुळे पदार्थातील जीवनसत्वांची कमीत कमी प्रमाणात घट होते तसेच पदार्थ सहा ते नऊ महिन्यांपर्यंत टिकू शकतो. पदार्थ निर्जलीकरण केल्याने त्याची घनता कमी होते. त्यामुळे साठवणुकीसाठी कमीत कमी जागा लागते. पदार्थांतील आर्द्रता निघून गेल्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवण्याची गरजच भासत नाही. या संयंत्राद्वारे निर्जलीकरण केल्याने आर्द्रता काढण्यासाठी कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर केला जात नाही. साठवण क्षमता वाढल्यामुळे कोणत्याही हंगामात त्या पदार्थाचे सेवन करता येते. प्रणव अनेक शेतकऱ्यांनाही निर्जलीकरणाची सेवा पुरवतो. यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही व्यावसायिक गुंतवणूक न करता, छोटा-मोठा व्यवसाय करण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
चौकट
कशाकशाचे केले निर्जलीकरण...
प्रणवने येथे कडीपत्ता, गवती चहा, हळद, आले, कांदा, लसूण, कसुरी पालक, मेथी, कोथिंबीर, पालक, पुदिना, सुरण यांचे निर्जलीकरण केले असून, निर्जलीकृत मोड आलेल्या कडधान्यांना विशेष मागणी आहे. सध्या त्यांना मोठी हॉटेल्स, मॉल्स, आफ्रिकन व युरोपियन देशात मोठी मागणी आहे.